चीन चंद्रावर ताबा मिळविण्याच्या तयारीत

- नासाच्या प्रमुखांचा इशारा

चंद्रावर ताबावॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिका व चीनमध्ये आता अंतराळासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. 2035 सालापर्यंत चीन चंद्रावरील आपल्या तळाचे काम पूर्ण करून प्रयोगांना सुरुवात करील. चीनच्या या तळाबद्दल अमेरिकेसह सर्वांनाच तीव्र चिंता वाटते. चंद्रावर उतरल्यावर चीन आता चंद्र आमचा आहे आणि बाकी सर्वांनी त्याच्यापासून लांबच रहावे असे सांगू शकतो. चीनचा अंतराळ कार्यक्रम हा लष्करी स्वरुपाचा आहे’, अशा शब्दात अमेरिकी अंतराळसंस्था ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनी चीनच्या अंतराळमोहिमेबाबत इशारा दिला.

चंद्रावर ताबागेल्या वर्षी अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ने चीनच्या अंतराळातील कारवायांबाबत विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला होता. ‘अंतराळाचे लष्करीकरण करणे, ही चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीची योजना आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणे आणि अमेरिकेवर आघाडी मिळविणे, हा चीनच्या योजनेचा एक भाग आहे. 2022 ते 2024 यादरम्यान, चीन पृथ्वीच्या कक्षेत स्पेस स्टेशन उभारणार आहे. या स्पेस स्टेशनचा वापर देखील अंतराळाच्या लष्करीकरणासाठी आणि अमेरिकेचा प्रभाव कमी करण्यासाठी होऊ शकतो’, असे अमेरिकेच्या अहवालात बजावण्यात आले होते.

चंद्रावर ताबात्यानंतर अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चे वरिष्ठ अधिकारी जनरल डेव्हिड थॉम्पसन यांनीही चीनला लक्ष्य केले होते. चीन दररोज अंतराळातील अमेरिकी उपग्रहांना लक्ष्य करीत आहे. अमेरिकी उपग्रहांवर हल्ले करण्यासाठी जॅमर्स, लेझर्स तसेच सायबरहल्ल्यांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप जनरल डेव्हिड थॉम्पसन यांनी केला होता. ‘अंतराळक्षेत्रातील क्षमतांचा विचार करता चीन रशियाच्या खूपच पुढे गेला आहे. चीन अत्यंत वेगाने अंतराळात विविध क्षमता असणाऱ्या यंत्रणा तैनात करीत आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत चीन अंतराळक्षेत्रातील आघाडीची सत्ता बनलेला असेल’, असे जनरल थॉम्पसन यांनी बजावले होते.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेची आघाडीची अंतराळसंस्था असणाऱ्या नासाच्या प्रमुखांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. जर्मन दैनिक ‘बिल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत, नेल्सन यांनी चीन आपल्या अंतराळवीरांना दुसऱ्या देशाचे उपग्रह नष्ट करण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोपही केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे साठे असण्याची शक्यता असून चीनदेखील त्याच भागात आपल्या मोहिमा राबवित असल्याकडे नासाच्या प्रमुखांनी लक्ष वेधले.

नेल्सन यांनी केलेल्या आरोपांवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नासाच्या प्रमुखांनी चीनबाबत केलेली वक्तव्ये बेजबाबदार असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र विभागाने केला आहे.

leave a reply