अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाच्या लष्करी सहकार्याविरोधात उत्तर कोरियाचा इशारा

सेऊल – अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात पार पडलेल्या लष्करी सहकार्यावरुन उत्तर कोरियाने धमकावले. अमेरिका, जपान व दक्षिण कोरियातील लष्करी सहकार्य आपल्याविरोधात आहे. तसेच आपण करीत असलेल्या शस्त्रसज्जतेसाठी देखील हे लष्करी सहकार्यच जबाबदार असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला. दरम्यान, उत्तर कोरिया लवकरच अणुचाचणी करणार आहे. त्याआधी या कम्युनिस्ट राजवटीने हा इशारा दिला आहे.

us-korea-japanगेल्या आठवड्यात स्पेनमध्ये नाटोची बैठक पार पडली. अमेरिका व नाटोने पहिल्यांदाच या बैठकीसाठी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या आपल्या सहकारी देशांना आमंत्रित केले होते. याच बैठकीत अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाच्या नेतृत्वामध्ये स्वतंत्र चर्चा पार पडली. यात तीनही देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. या बैठकीत चीन तसेच उत्तर कोरियाच्या धोक्यावर चर्चा झाली होती.

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या लष्करी सहकार्याविरोधात इशारा प्रसिद्ध केला. या लष्करी सहकार्यामुळे कोरियन क्षेत्रातील वातावरण बिघडले असून उत्तर कोरियाला स्वसंरक्षणासाठी सज्जता वाढवावी लागत आहे, असे उत्तर कोरियाने जाहीर केले. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेच्या नौदलाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात 25 देशांबरोबर सुरू केलेला युद्धसराव म्हणजे उत्तर कोरियामध्ये घुसखोरीची पूर्वतयारी असल्याचा ठपका ठेवला.

दरम्यान, येत्या काही दिवसात उत्तर कोरिया अणुचाचणी घेत आहे. पाश्चिमात्य देश याआधीच उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींवर चिंता व्यक्त करीत आहेत. तसेच उत्तर कोरियावर कठोर निर्बंधांचे इशारेही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, आपल्या या अणुचाचणीसाठी अमेरिका व मित्रदेशांवर खापर फोडण्याची तयारी उत्तर कोरियाने केल्याचे दिसत आहे.

leave a reply