रशियावरील कठोर निर्बंधानंतर चीनची युक्रेनशी चर्चा

बीजिंग – बुधवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात निरपराध नागरिकांचा बळी गेल्यावर तीव्र चिंता चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर लादलेली कठोर आर्थिक निर्बंध आणि ‘स्विफ्ट’मधून बाहेर केल्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला जबर नुकसान पोहोचेल, असा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. रशियाबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारी सहकार्य असणार्‍या चीनला देखील याचे हादरे जाणवतील, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनने युक्रेनशी संपर्क साधल्याचे दिसत आहे.

युक्रेनशी चर्चादोन दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत भारत, युएई यांच्यासह चीनने रशियाविरोधी मतदानात सहभागी होण्याचे टाळले होते. यानंतर अमेरिका, युरोपिय देश तसेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांनी रशियावर कठोर निर्बंध जाहीर केले. अमेरिका व युरोपिय देशांनी रशियन विमाने तसेच जहाजांना आपल्या हवाई तसेच सागरी क्षेत्रात परवानगी नाकारली आहे. याशिवाय रशियन भाषेच्या वापरावरही बंदी टाकली आहे. अमेरिका व युरोपिय देशांमधील बँका आणि वित्तसंस्थांशी जोडलेल्या स्विफ्ट यंत्रणेच्या रशियातील वापरावरही पाश्‍चिमात्य देशांनी बंदी टाकली.

या कठोर निर्बंधांचा परिणाम रशियावर होईल, असा दावा रशियातील विश्‍लेषकच करीत आहेत. यामुळे रशिया आर्थिकदृष्ट्या जगाशी कापला गेला असून रशियाच्या लष्करी सामर्थ्यावर याचा परिणाम होईल, असे दावे युरोपातील माध्यमे करू लागली आहेत. रशियाबरोबर सहकार्य करणार्‍या मित्र व सहकारी देशांनाही या निर्बंधांचा फटका बसेल, असे जागतिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन आणि नैसर्गिक गॅसची खरेदी करणारा चीनला याचा जबर फटका बसेल, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे चीनचे हितसंबंध देखील बाधित झाल्याचा दावा ब्रिटनमधील माध्यमे करीत आहेत. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा युक्रेनमधून जातो. चीनला युरोपशी जोडणारी रेल्वेमार्ग युक्रेनमधूनच प्रवास करते. अशा परिस्थितीत, हा संघर्ष भडकल्यामुळे चीनच्या या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचे ब्रिटीश माध्यमांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करून रशियाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमे करीत आहेत

leave a reply