युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतिन एकाकी पडले आहेत

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा उल्लेख हुकुमशहा असा करून युक्रेनवरील हल्ल्यानंतर ते जगापासून अधिकच वेगळे व एकटे पडल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला. आपल्या ‘स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस’मध्ये बायडेन यांनी, युक्रेनमधील संघर्ष हा हुकुमशाही व लोकशाहींमधील संघर्ष असल्याचे सांगून त्यात लोकशाही जिंकत असल्याचेही सांगितले. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अशी ग्वाही देणार्‍या बायडेन यांनी युक्रेनमध्ये अमेरिका लष्कर पाठविणार नसल्याचा खुलासाही केला आहे.

पुतिन एकाकी पडलेमंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या ‘स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस’ची सुरुवात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या मुद्यावरच केली. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सहा दिवसांपूर्वी युक्रेनवर हल्ला चढवून मुक्त जागतिक व्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न केला. युक्रेनमध्ये लष्कर घुसवून ताबा मिळवू व जग बघत राहिल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र युक्रेनी जनतेने निर्धाराने उभ्या केलेल्या भिंतीने पुतिन यांचे इरादे उधळून लावले’, असा दावा बायडेन यांनी केला.

‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर चढविलेला हल्ला पूर्वनियोजित व कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आला होता’, असा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. राजनैतिक प्रयत्न धुडकावून लावणार्‍या पुतिन यांनी अमेरिकेसह पाश्‍चिमात्य जगात फूट पाडण्याचे प्रयत्न केले, असेही बायडेन म्हणाले. मात्र अमेरिकेसह मित्रदेश पुतिन यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज होते व आम्ही पूर्वतयारी केली होती, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यावेळी सांगितले.

पुतिन एकाकी पडलेरशियाकडून छेडण्यात आलेल्या या युद्धाची इतिहासात नोंद होईल, असा दावा करून अमेरिका व नाटो युक्रेनचे रक्षण करील, असा दावाही त्यांनी केला. मात्र अमेरिका युक्रेनमध्ये लष्कर तैनात करणार नसल्याचेही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुढे स्पष्ट केले. युक्रेनच्या जनतेचा उल्लेख करताना बायडेन यांनी चुकून इराणचा केलेला उल्लेख यावेळी लक्ष वेधून घेणारा ठरला.

सुरुवातीची जवळपास १० मिनिटे युक्रेनला दिल्यानंतर बायडेन यांनी कोरोना व अमेरिकेसमोर असलेली इतर आव्हाने आणि आपली कामगिरी यांचा उल्लेख केला. यात, अमेरिकेतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीसयंत्रणांना देण्यात येणारा निधी वाढविण्याचे आश्‍वासन लक्ष वेधून घेणारे ठरले. बायडेन यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील एका गटाने ‘डिफंड द पोलीस’ या मोहिमेचा आक्रमक पुरस्कार केला होता. मात्र राष्ट्राध्यक्षांनी अधिक निधी देण्याचा उल्लेख करून या मोहिमेतील हवा काढून घेतल्याचे सांगण्यात येते.

leave a reply