चीनने अमेरिकेशी सहकार्य वाढविणार्‍या असियान देशांना धमकावले

बीजिंग – अमेरिका जाणुनबुजून ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असून असियान देशांनी अमेरिकेच्या हालचालींचे समर्थन करु नये, असा इशारा चीनचे उपपरराष्ट्रमंत्री लुओ झाहुई यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील फिलिपाईन्सच्या हक्कांच्या सुरक्षेसाठी अमेरिका लष्करी सहाय्य करावे, असे आवाहन फिलिपाईन्सने केले होते. यामुळे संतापलेल्या चीनने असियान देशांना धमकावल्याचे दिसत आहे.

असियान

गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींवर चिंता व्यक्त करुन चीनच्या नौदलाने फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरी व हल्ले चढविले तर अमेरिकेने लष्करी सहाय्य करावे, अशी मागणी फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती. फिलिपाईन्सच्या या आवाहनाला अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याआधी व्हिएतनामने देखील चीनच्या सागरी अरेरावीविरोधात अमेरिकेकडे सहाय्याची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी असियान देशांबरोबरच्या बैठकीत चीनने यावर आपला संताप व्यक्त केला.

असियानअमेरिका ‘साऊथ चायना सी’मधील शांती आणि स्थैर्याच्या आड येत असून या क्षेत्रातील देशांनी अमेरिकेला सहाय्य करू नये, असे चीनचे उपपरराष्ट्रमंत्री झाहुई यांनी बजावले. येत्या काही दिवसात अमेरिका आणि असियान देशांमध्ये विशेष बैठक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आधीच असियान देशांना धमकावल्याचे दिसत आहे. संपूर्ण ‘साऊथ चायना सी’वर आपला अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. यासाठी चीनने आग्नेय आशियाई देशांचे अधिकारही धुडकावले असून हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

असियानदरम्यान, असियान देशांना धमकावणार्‍या चीनने गेल्या काही दिवसात तीन युद्धसरावांचे आयोजन केले होते. साऊथ चायना सी, तैवानचे आखात व ‘यलो सी’ यांना व्यापणारा चीनचे हे युद्धसराव जपान, दक्षिण कोरिया, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया या देशांसाठी इशारा ठरले होते. चीनचा हा युद्धसराव म्हणजे सदर सागरी क्षेत्रावरील आपली पकड मजबूत करण्याचा तसेच अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्‍न असल्याचा दावा लष्करी विश्लेषकांनी केला होता. चीनच्या या युद्धसरावामुळे सदर सागरी क्षेत्रातील तणाव वाढल्यानंतर अमेरिकेने ‘यू-२’ या टेहळणी विमाने रवाना केली होती. यामुळे पारा चढलेल्या चीनने मध्यम पल्ल्याच्या तसेच विमानवाहू युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन अमेरिकेला ‘लष्करी अपघाता’ची धमकी दिली होती.

leave a reply