चीनकडून ‘आयफोन’सह ॲपलच्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची धमकी

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेने ‘वुईचॅट’ या चिनी ॲपवरील बंदीची अंमलबजावणी केल्यास चीनदेखील ‘आयफोन’सह ‘ॲपल’च्या उत्पादनांवर बंदी टाकेल, अशी धमकी चीनने दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘टिकटॉक’ व ‘वुईचॅट’ या प्रमुख चिनी ॲप्सवर निर्बंधांची घोषणा करून, त्याची अंमलबजावणी न झाल्यास बंदी टाकण्याचा इशारा दिला होता. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना चीनने अमेरिकी कंपन्यांवरही अशाच स्वरूपाची कारवाई होऊ शकते, असे बजावले होते. ॲपल कंपनीवरील बंदीची धमकी त्याचाच भाग दिसत आहे.

चीनकडून 'आयफोन'सह ॲपलच्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची धमकीदोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरोधात व्यापारयुद्धाची घोषणा केली होती. या व्यापारयुद्धाअंतर्गत ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इंटरनेट क्षेत्रातील चिनी कंपन्यांच्या वर्चस्वाविरोधात कारवाईही सुरू केली होती. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट या कंपन्यांच्या माध्यमातून हेरगिरी, बौध्दिक संपदेची चोरी, खोट्या माहितीचा प्रसार तसेच आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ट्रम्प यांनी या मुद्द्यावर ‘इमर्जन्सी’ही जाहीर केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी कम्युनिस्ट राजवटीशी थेट संबंध असलेल्या कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने चीनकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

‘चीनमधील व्यवहारांसाठी अमेरिकेतील चिनी कंपन्या व त्यांच्या अधिकाऱ्यांवर बंदी टाकणे असमर्थनीय आहे. वुईचॅट ॲपवरील बंदी ही अमेरिकी प्रशासनाची चाचेगिरी आहे. अमेरिकेने जर वुईचॅट ॲपवर बंदी टाकली तर चीनही आयफोनसह ॲपलच्या उत्पादनांवर बंदी टाकेल’, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून चिनी कंपन्या व ॲप्सवर टाकण्यात येणारी बंदी ही व्यापारी क्षेत्रातील दादागिरी असल्याचा आरोपही चीनच्या प्रवक्त्यांनी केला.

चीनकडून 'आयफोन'सह ॲपलच्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची धमकीयावेळी लिजिअन यांनी, चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट ‘वैबो’ने केलेल्या सर्वेक्षणाचाही उल्लेख केला. ट्विटरची ‘चिनी कॉपी’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या वैबोने, अमेरिका-चीन वादासंदर्भात चिनी नागरिकांची प्रतिक्रिया विचारली होती. अमेरिकेने वुईचॅट ॲपवर बंदी टाकल्यास आयफोनसह ॲपल कंपनीची सर्व उत्पादने वापरणे सोडून देऊ, असा दावा ९५ टक्के यूजर्सनी केल्याचे वैबोने म्हंटले आहे.

चीनच्या स्मार्टफोन व तंत्रज्ञान बाजारपेठेत ॲपल कंपनीचा वाटा सुमारे नऊ टक्क्यांच्या आसपास असून, गेल्यावर्षी चीनमधून ॲपलला ४४ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला होता. ॲपलच्या एकूण उत्पन्नात १५ टक्के हिस्सा चीनचा असून, ‘आयफोन’साठीही चीन सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ॲपल उत्पादनांच्या निर्मितीसाठीही चीन हे सर्वात मोठे केंद्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेले व्यापारयुद्ध व त्यावर लादलेल्या करांनंतरही ॲपलने चीनमधील आपल्या उत्पादनांची निर्मिती व विक्री थांबविली नव्हती.

मात्र कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प यांनी चीनविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका ॲपलच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. चीनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या धमकीनुसार, ॲपलवर चीनमध्ये बंदी टाकण्याचा निर्णय झाल्यास कंपनीसाठी तो सर्वात मोठा धक्का ठरू शकतो. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने यापूर्वीच युट्युब व ट्विटरवर बंदी घातली असून मायक्रोसॉफ्टलाही कारवाईचा इशारा दिला आहे.

leave a reply