महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला युरोपिय महासंघाचा इशारा

ब्रुसेल्स – ऑनर किलिंग, महिलांचे अपहरण आणि अत्याचार तसेच महिलांवरील ॲसिड हल्ले, यासाठी जगभरात बदनाम असलेल्या पाकिस्तानला युरोपिय महासंघाच्या संसदेने चांगलेच खडसावले आहे. पाकिस्तानात महिलांच्या विरोधात होणारा हिंसाचार आणि त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक यापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने वेगाने पावले उचलावी, अशी सूचना युरोपिय महासंघाच्या संसदेने केली आहे. याची अंमलबजावणी करण्यात पाकिस्तानच्या सरकारला अपयश आले तर, युरोपिय महासंघाकडून पाकिस्तानला मिळणार्‍या सवलती काढून घेतल्या जातील, असे महासंघ व महासंघाच्या संसदेने बजावले आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला युरोपिय महासंघाचा इशारापाकिस्तानमध्ये हजारो महिला ऑनर किलिंग आणि हिंसाचाराला बळी पडतात. पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये किमान हजार महिला ऑनर किलिंगला बळी पडल्या. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानने याविरोधात काही पावले उचलली आहेत. पण मुली आणि महिलांवर होणार्‍या भेदभाव आणि हिंसाचाराविरोधात पाकिस्तानने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे युरोपिय महासंघाच्या संसदेने लक्षात आणून दिले. इम्रान खान सरकारमधील माजी मंत्री इशाक खाकवानी यांनी याबाबत आपल्याच सरकारवर टीकाही केली होती, याकडेही महासंघाच्या संसदेने लक्ष्य वेधले.

त्याचबरोबर, पाकिस्तानमध्ये बालविवाह ही सर्वात मोठी समस्या आहे. अद्याप पाकिस्तानने या विरोधात कायदा आणलेला नाही. या सर्व प्रकरणी २०१९ साली युरोपिय महासंघ आणि पाकिस्तानच्या बैठकीत चर्चा पार पडली होती. मात्र अद्याप यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आलेली नसून सप्टेंबर महिन्यापर्यंत इम्रान सरकारने यावर खुलासा करावा, असे महासंघाच्या संसदेने पाकिस्तानला फटकारले.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये मे महिन्यात आठ वर्षाच्या मुलीची हत्या झाली होती. ती बालकामगार होती. काम करीत असलेल्या ठिकाणी तिचा छळ करुन तिची निर्घृण हत्या केली गेली. यानंतर पाकिस्तानमध्ये बालकामगारांच्या शोषणाविरोधात संतापाची लाट उसळली. युरोपिय महासंघाच्या मानवाधिकार आयोगाने देखील हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार विभागाच्या मंत्री शिरीन मजारी यांनी पाकिस्तानामध्ये बालमजूरीच्या विरोधात कडक कायदे करण्याचे आश्वासन दिले होते. पण या आघाडीवर काहीही करण्यात पाकिस्तानला यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, युरोपिय महासंघाच्या संसदेने पाकिस्तानमधील बालमजूरीवर चिंता व्यक्त केली आहे. कंगाली आणि बेकारीने ग्रासलेल्या पाकिस्तानमध्ये जवळपास, एक कोटी ९० लाख बालमजूर असल्याचे सांगून त्यांच्या शोषणावर महासंघाच्या संसदेने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.

leave a reply