चीनचे मानवरहित ‘ड्रोनवाहू’ जहाज तैनातीसाठी सज्ज

‘ड्रोनवाहू’बीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील संशोधन तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी आपले मानवरहित ‘ड्रोनवाहू’ जहाज सज्ज असल्याची घोषणा चीनने केली. या जहाजाचा वापर पूर्णपणे नागरी कार्यासाठी केला जाणार असल्याचे चीनची राजवट व माध्यमांचे म्हणणे आहे. पण मानवरहित व ड्रोन्सनी सज्ज असलेल्या या जहाजाचा वापर चीन तैवानविरोधात लष्करी ड्रोनवाहू युद्धनौका म्हणून करू शकतो, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्लेषकांचे करीत आहेत.

चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या ‘चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन’ची उपकंपनी हुआंगू वेंशाँग शिपयार्डने 2021 साली ‘झु हाई यून’ या मानवरहित ड्रोनवाहू जहाजाची निर्मिती सुरू केली होती. गेल्या वर्षाच्या मे महिन्यात झु हाई यून जहाजाचे जलावतरण करून त्याच्या सागरी चाचण्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यात चीनच्या ग्वांगडाँग प्रांतातील झुहाई गाओलन बंदरात दाखल झालेले सदर जहाज पुढच्या तैनातीसाठी सज्ज असल्याचे चीनने जाहीर केले.

‘ड्रोनवाहू’रिमोट कंट्रोलने नियंत्रित केल्या जाणाऱ्या या जहाजाचा वापर सागराच्या तळातील पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली. सागरी पर्यावरणाच्या अभ्यासासाठी अशा प्रकारचे मानवरहित ड्रोनवाहू जहाजाची तैनाती करण्याची जगातील ही पहिलीच वेळ असल्याचा दावा चीनचे मुखपत्र तसेच इतर माध्यमे करीत आहे. यामुळे सागरी आपत्तींची माहिती मिळवून त्या रोखता येतील, असेही एका माध्यमाने म्हटले आहे.

पण सदर जहाज फक्त सागरी संशोधनासाठी असल्याचा दावा चीन करीत असला तरी या जहाजाची बनावट चीनच्या ‘टाईप 076’ युद्धनौकेसाठी असल्याचा संशय व्यक्त केला जातो. चीन लवकरच तयार करीत असलेली टाईप 076 युद्धनौका ही मानवरहित हेलिकॉप्टर्स वाहून नेण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच ‘झु हाई यून’ जहाजातून ड्रोन्स, मानवरहित बोटी आणि पाणबुड्या देखील लाँच करता येणार आहेत. त्यामुळे चीनचे सदर जहाज ड्रोनवाहू युद्धनौकेसारखे काम करणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्लेषक करीत आहेत.

चीनने याआधीच तैवानच्या विरोधात मोठ्या प्रमाणात सागरी तैनाती केली आहे. तैवानबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन झु हाई यून या जहाजाचा वापर तैवानविरोधात देखील करू शकतो, अशी चिंता या विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

English हिंदी

leave a reply