तुर्की कोणत्याही क्षणी सिरियात हल्ले चढविल

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

अंकारा – सिरियातील अस्साद सरकारबरोबर चर्चेसाठी रशियाने दिलेला प्रस्ताव तुर्कीला अमान्य असल्याचे उघड झाले आहे. कोणत्याही क्षणी तुर्की सिरियावर हल्ले चढविल, असा इशारा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. याची गंभीर दखल घेऊन इराकने तुर्कीच्या सीमेजवळील लष्कर तैनाती वाढविली आहे.

गेल्या आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विशेषदूतांनी सिरियाचा दौरा केला होता. सिरिया आणि तुर्कीमध्ये चर्चा घडवून सीमेवरील संघर्ष रोखण्यासाठी रशियाने मध्यस्थी केली होती. सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी रशियाच्या या मध्यस्थीचे स्वागत केले होते. तसेच तुर्की देखील सिरियाच्या भूभागातून माघार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

रशियाच्या या प्रस्तावावर आणि सिरियाने केलेल्या मागणीवर तुर्कीने प्रतिक्रिया दिली नाही. पण तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार इब्राहिम कालिन यांनी सिरियाला स्पष्ट शब्दात धमकावले आहे. रशियाने शांती प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न म्हणजे सिरियावरील कारवाईचा शेवट असा होत नाही. तुर्कीने योजलेली सिरियातील लष्करी कारवाई कधीही सुरू होऊ शकते. तुर्कीच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याच्या तीव्रतेवर ही कारवाई पार पाडली जाईल, अशी धमकी कालिन यांनी दिली.

सिरियातील कुर्द आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा तुर्की करीत आहे. तुर्कीसह सिरिया व इराकमधील कुर्दांच्या टोळ्यांना तुर्कीने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या संघटनांवरील कारवाईसाठी तुर्की अमेरिका तसेच रशियाच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करीत आहे.

दरम्यान, तुर्कीच्या लष्करी व हवाई हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन इराकने आपल्या सीमेवरील जवानांची तैनाती वाढविली आहे.

leave a reply