हाँगकाँगमधील लोकशाही दडपून चीनने १९८४ सालच्या कराराचे उल्लंघन केले

- ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा गंभीर आरोप

लंडन – हाँगकाँगमधील काराभारावरुन चीनने १९८४ साली ब्रिटनबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी केला. हाँगकाँगमधील जनतेला लोकशाहीने दिलेले अधिकार काढून घेऊन चीन येथील विरोधकांचे आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका राब यांनी ठेवला आहे. तर ब्रिटनमधील चीनच्या दूतावासाने आपल्या देशावर केला जात असलेली टीका निराधार असल्याचे म्हटले आहे.

आठवड्याभरापूर्वी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने संसदेत नवे विधेयक पारित केले होते. या नव्या विधेयकानुसार, चीनच्या सत्ताधारी राजवटीला हाँगकाँगच्या विधिमंडळासाठी उभ्या राहणार्‍या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळाला आहे. या विधेयकाबरोबर चीनने हाँगकाँगवरील आपली पकड अधिक घट्ट केली असून चीनच्या सत्ताधारी राजवटीने हाँगकाँगमधील लोकशाहीवादी गटांवर दडपशाहीचा वरवंटा फिरविण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री राब यांनी शनिवारी माध्यमांसाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चीनच्या या कारवाईवर कोरडे ओढले. १९८४ सालच्या ‘जॉईंट डिक्लेरेशन’चे चीन अनुपालन करीत असल्याचा आरोप ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. त्याचबरोबर ब्रिटनकडून हाँगकाँगचे नियंत्रण घेताना चीनने दिलेली आश्‍वासने आणि या देशाची सध्या सुरू असलेली कारवाई यामध्ये फार मोठी तफावत असल्याचा ठपका परराष्ट्र मंत्री राब यांनी ठेवला.

चीनने १९८४ सालच्या कराराचे कायदेशीररित्या पालन करावे आणि हाँगकाँगच्या जनतेच्या स्वातंत्र्याचे व मुलभूत अधिकारांचा आदर करावा, अशी अपेक्षा असल्याचे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

leave a reply