तुर्कीबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीसचे अमेरिका, सौदी अरेबिया व इस्रायलबरोबर युद्धसराव

अथेन्स – तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रात वर्चस्ववादी कारवाया सुरू असतानाच ग्रीसनेही त्याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तुर्कीच्या कारवायांना शह देण्यासाठी ग्रीसने अमेरिकेसह अनेक प्रमुख देशांबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रीस सातत्याने संयुक्त युद्धसरावांमध्ये सहभागी होत आहे. गेल्या सात दिवसांच्या कालावधीत ग्रीस अमेरिका, सौदी अरेबिया व इस्रायलबरोबर युद्धसरावात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. ग्रीस व सौदीतील युद्धसरावावर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांपासून तुर्कीकडून आखात तसेच भूमध्य सागरी क्षेत्रात आक्रमक हालचाली सुरू आहेत. गेल्या वर्षी तुर्कीने ग्रीसच्या हद्दीतील बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा करून इंधनक्षेत्रात संशोधन करण्यासाठी जहाजे व युद्धनौका पाठविल्या होत्या. त्यानंतर भूमध्य सागरी क्षेत्रातील तणाव चिघळला असून ग्रीसने तुर्कीला रोखण्यासाठी इतर देशांचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात अमेरिका व युरोपिय देशांव्यतिरिक्त इस्रायल, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांचा समावेश आहे.

अमेरिका, इस्रायल, फ्रान्स तसेच ‘युएई’बरोबर ग्रीसने संरक्षण करार केले असून इजिप्त व सौदी अरेबियाबरोबरही सामंजस्य करारांबाबत बोलणी सुरू आहेत. भूमध्य सागरात आयोजित होणारे युद्धसराव व त्यातील ग्रीसचा सहभागही याच सहकार्याचा भाग मानला जातो. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या नौदलाने ‘नोबल दिना’ या नावाचा संयुक्त नौदल सराव आयोजित केला होता. त्यात ग्रीसबरोबरच सायप्रस व फ्रान्स या देशांचाही सहभाग होता.

शुक्रवारी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘ड्वाईट डी आयसेनहॉवर’ आपल्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह ग्रीसनजिकच्या भूमध्य सागरी क्षेत्रात दाखल झाली. त्यानंतर शनिवारपासून अमेरिका व ग्रीसदरम्यान व्यापक नौदल सरावाला सुरुवात झाली असून त्यात ग्रीसची प्रगत विनाशिका ‘प्सरा’, दोन पाणबुड्या व लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. नौदल सरावानंतर ग्रीसची लढाऊ विमाने अमेरिकी हवाईदलाबरोबर हवाई सरावातही सहभागी होतील, अशी माहिती ग्रीक सूत्रांनी दिली.

दरम्यान, शनिवारी सौदी अरेबियाच्या हवाईदलाचे पथक ग्रीसच्या क्रेटे बेटावर दाखल झाले आहे. सौदी अरेबियाने आपली सहा ‘एफ-१५सी’ लढाऊ विमाने सरावासाठी धाडली आहेत. ग्रीस व सौदी अरेबियादरम्यान संयुक्त हवाईसराव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सौदी अरेबिया व ग्रीसमधील या संयुक्त सरावावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी नाराजी व्यक्त केली असून ही अत्यंत निराशाजनक गोष्ट असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी आपण या मुद्यावर सौदी अरेबियाशी बोलणी करु, असेही एर्दोगन यांनी सांगितले.

leave a reply