जपानपासून सावध राहण्याचा चीनचा ऑस्ट्रेलियाला इशारा

जपानपासून सावधकॅनबेरा – ‘दुसऱ्या महायुद्धात जपानने ऑस्ट्रेलियाच्या डार्विनवर बॉम्बहल्ले चढविले होते. ऑस्ट्रेलियन्स जनता आणि युद्धकैद्यांचाही बळी घेतला होता. अशा जपानशी मैत्री करताना सावध रहा. भविष्यात जपान ऑस्ट्रेलियाला पुन्हा लक्ष्य करू शकेल’, असा इशारा ऑस्ट्रेलियातील चीनच्या राजदूतांनी दिला. साऊथ चायना सी, तैवान व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जपान व ऑस्ट्रेलियामध्ये नवे लष्करी सहकार्य प्रस्थापित होत आहे. यामुळे असुरक्षित बनलेल्या चीनने ऑस्ट्रेलियाच्या सरकारला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात जपानच्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानीज यांची भेट घेऊन सुरक्षाविषयक नवा करार केला होता. यानुसार, जपानचे जवान ऑस्ट्रेलियाच्या डार्विन तळावर प्रशिक्षण घेणार होते. त्याचबरोबर उभय देशांच्या गुप्तचर यंत्रणेतील सहकार्याबाबतही चर्चा पार पडली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची आक्रमकता मर्यादित करण्यासाठी जपान व ऑस्ट्रेलियामध्ये हा करार पार पडल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता.

जपानपासून सावधजपान व ऑस्ट्रेलियातील हे सहकार्य चीनच्या साऊथ तसेच ईस्ट चायना सीतील वर्चस्वाला आव्हान देणारे असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांनी म्हटले होते. तैवानबाबत चीनच्या लष्करी हालचाली वाढत असताना जपान-ऑस्ट्रेलियातील सदर सहकार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचा दावाही काही विश्लेषकांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून जपानच्या पंतप्रधानांनी तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांनी एकत्र होण्याचे आवाहन केले होते. तर तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करून ऑस्ट्रेलियाने देखील चीनविरोधात भूमिका स्वीकारली होती. या पार्श्वभूमीवर, जपान व ऑस्ट्रेलियातील सदर संरक्षण सहकार्य चीनच्या तैवानबाबतच्या धोरणांना आव्हान ठरू शकते, असेही या विश्लेषकांचे म्हणणे होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या करारावर जोरदार टीका केली होती. पण मंगळवारी ऑस्ट्रेलियातील चीनचे राजदूत शिआयो कियान यांनी ऑस्ट्रेलियाला इतिहासाची भीती घालून जपानपासून वेगळे काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी चीनच्या राजदूतांनी दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख करून जपानच्या तत्कालिन राजवटीने अमेरिका, ब्रिटनचा मित्रदेश असलेल्या ऑस्ट्रेलियावर हवाई हल्ले चढविले होते, याची आठवण कियान यांनी करुन दिली. दुसऱ्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन नागरिकांचा बळी घेणाऱ्या जपानबरोबर सहकार्य करू नये, असा इशारा कियान यांनी दिला.

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनबाबत अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या व्हायरससाठी चीनला जबाबदार धरले होते. त्याचबरोबर चीन ऑस्ट्रेलियाच्या राजकारणापासून शैक्षणिक क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचा आरोप करून मॉरिसन यांनी चीनच्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लादण्याची भूमिका स्वीकारली होती. चीनच्या नेत्यांनी देखील ऑस्ट्रेलियन नेत्यांचा राजकीय बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान अल्बानीज चीनबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. ही संधी साधून चीनने ऑस्ट्रेलियाला जपानबरोबरच्या सहकार्यातून माघार घेण्याचा इशारा दिला आहे.

leave a reply