ग्रीसला रोखण्यासाठी तुर्कीने क्रेटे बेटाजवळ विमानवाहू युद्धनौका रवाना करावी

- तुर्कीचे माजी लष्करी अधिकारी व विश्लेषकांची मागणी

क्रेटेअंकारा – ग्रीसने आपल्या सागरी हद्दीत, क्रेटे बेटांच्या क्षेत्रात सुरू केलेल्या हालचालींमुळे अस्वस्थ झालेल्या तुर्कीने ग्रीसला धमकावण्यास सुरू केले आहे. क्रेटे बेटांप्रकरणी कुठलीही हालचाल करण्याआधी ग्रीसने इतिहासाची आठवण ठेवावी आणि नव्या संकटांना आमंत्रित करू नये, असे तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी काही तासांपूर्वी बजावले होते. तर तुर्कीच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने एर्दोगन सरकारला ग्रीसविरोधात लष्करी आक्रमकता दाखविण्याचे आवाहन केले आहे. ग्रीसला रोखायचे असेल तर तुर्कीने आपली ॲम्फिबियस विमानवाहू युद्धनौका क्रेटे बेटाजवळ रवाना करावी, असे तुर्कीच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

तुर्की व ग्रीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘एजिअन’ सागरी क्षेत्रातील बेटे व इंधनक्षेत्राच्या अधिकारांवरून असलेला तणाव चांगलाच चिघळला आहे. तुर्कीने एजिअन सागरी क्षेत्रातील ग्रीसच्या हद्दीत इंधनक्षेत्राचे संशोधन तसेच उत्खननासाठी जहाजे पाठविली होती. तुर्कीच्या नजिक असलेल्या ग्रीक बेटांवरील लष्कर मागे घेऊन ग्रीसने त्यावरील हक्क सोडून द्यावा, अशी आक्रमक मागणी तुर्कीच्या राजवटीने केली होती. तुर्कीच्या या आक्रमकतेला प्र्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही क्रेटे बेटांची हद्द 12 नॉटिकल मैलांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

क्रेटे बेट ग्रीसच्या हद्दीत असून आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार, ग्रीसला याची हद्द 12 नॉटिकल मैलांपर्यंत वाढविण्याचा अधिकार आहे. ग्रीसने तशी कारवाई केलीच, तर संतापलेल्या तुर्कीची क्षेपणास्त्रे ग्रीसची राजधानी अथेन्सवर मारा करु शकतात, असे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले होते. क्रेटे बेटापासून सहा नॉटिकल मैल अंतरापर्यंत हद्द नेण्यापलिकडे कुठलीही हालचाल खपवून घेणार नाही, असे सांगून तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी आपला देश आंतरराष्ट्रीय नियमांना किंमत देणार नसल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर ग्रीसने इतिहासाची आठवण ठेवावी, अशा शब्दात अकार यांनी ग्रीसला धमकावले.

पहिल्या महायुद्धानंतर, 1919-22 या कालावधीत ग्रीसने तुर्कीविरोधात युद्ध पुकारले होते. अनातोली प्रांतासाठी पेटलेल्या या संघर्षात तुर्कीने ग्रीसच्या भूभागाचा ताबा मिळविला होता. यामध्ये ग्रीसला मोठी जीवितहानी सहन करावी लागली होती. तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी ग्रीसला या युद्धाची आठवण करून दिली. तर तुर्कीच्या लष्कराचे निवृत्त अधिकारी व स्थानिक अभ्यासगटाचे विश्लेषक एरे गुकूअर यांनी थेट ग्रीसच्या विरोधात ‘टीसीजी अनादोलू’ ही ॲम्फिबियस विमानवाहू युद्धनौका तैनात करण्याची चिथावणी दिली.

सदर युद्धनौका एजियनच्या समुद्रात जाऊन ग्रीसच्या नौदलाला रोखू शकत नाही. त्याऐवजी तुर्कीने क्रेटे आणि ऱ्होड बेटांमध्ये ही युद्धनौका तैनात करून ग्रीसला कोंडीत पकडावे, असे गुकूअर यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सुचविले आहे. असे इशारे व धमक्या दिल्या तरी ग्रीसच्या विरोधात अशी कारवाई करणे तुर्कीसाठी सोपे जाणार नाही. कारण ग्रीस आणि तुर्की यांच्यातील या वादात युरोपिय देश सध्या तरी ग्रीसच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे.

leave a reply