अमेरिकेने चिनी कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधाना प्रत्युत्तर देऊ – चीनचा इशारा

बीजिंग – उघुरांच्या मुद्यावर अमेरिकेने चिनी कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांना कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने उघुरवंशियांवरील अत्याचारातील सहभागावरून 14 चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या मुद्यावरून चिनी कंपन्यांना लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ आहे.

निर्बंधाना प्रत्युत्तर‘झिंजिआगंमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात सहाय्य करणार्‍या व चीनच्या लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिकी तंत्रज्ञान वापरणार्‍या कंपन्यांविरोधात कठोर व निर्णायक कारवाई करण्यास अमेरिकेचा वाणिज्य विभाग वचनबद्ध आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणार्‍या व अमेरिकी मूल्यांशी विसंगत असणार्‍या कारवाया करणार्‍या व्यक्ती, कंपन्या व देशांविरोधात आक्रमक धोरण राबविले जाईल’, अशा शब्दात अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जिना रायमोंडो यांनी चीनविरोधातील कारवाईचे समर्थन केले.

वाणिज्य विभागाने चीनच्या 14 कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले असून अमेरिकी कंपन्यांना या कंपन्यांबरोबर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत. अमेरिकेच्या या कारवाईविरोधात चीनची तीव्र प्रतिक्रिया आली. चीनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, अमेरिकेच्या कारवाईला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे. ‘अमेरिकेची कारवाई आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक नियमांचे गंभीर उल्लंघन ठरते. अमेरिकेकडून चीनच्या कंपन्यांविरोधात दडपशाही सुरू आहे’, असा आरोप चीनने केला आहे.

निर्बंधाना प्रत्युत्तरचीनचे कायदेशीर हक्क व हितसंबंध जपण्यासाठी अमेरिकेविरोधात आक्रमक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही चीनने दिला. गेल्याच महिन्यात चीनच्या संसदेने लॉ ऑन काऊंटरिंग फॉरेन सँक्शन्स’ नावाचा कायदा मंजूर केला होता. चीनच्या कंपन्यांविरोधात निर्बंध लादल्यास परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. चीनचा हा कायदा म्हणजे चीनच्या ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चा भाग असल्याचा दावा विश्‍लेषक जिआन्ली यांग यांनी केला होता.

गेल्या काही वर्षात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरात वर्चस्ववादी कारवायांना वेग देण्यात आला आहे. त्यात गेल्या वर्षी जगभरात फैलावलेली कोरोनाची साथ व उघुरवंशियांवरील अत्याचारांची भर पडली आहे. या प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र असंतोष आहे. चीनची आक्रमकता व विस्तारवादी धोरणांविरोधात पाश्‍चात्य देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यात चीनविरोधातील व्यापक निर्बंधांचा समावेश आहे. याला उत्तर देण्याची तयारी चीनने केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र याचे फार मोठे परिणाम चीनलाही चुकते करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाबरोबरील व्यापारयुद्धात चीनने ऑस्ट्रेलिया धडा शिकविण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे चीनचे मोठे नुकसान झाल्याचे उघड झाले होते.

leave a reply