निर्वासितांचा शस्त्रासारखा वापर करणार्‍या देशांवर युरोपिय महासंघाने कारवाई करावी – ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी

ब्रुसेल्स – तुर्की, बेलारुस, अफगाणिस्तान यासारखे देश निर्वासितांचा शस्त्र म्हणून वापर करीत आहेत. त्याविरोधात युरोपिय महासंघाने कारवाई करावी, अशी आग्रही मागणी ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. बु्रसेल्समध्ये महासंघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत असून, या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलनबर्ग यांनी हे वक्तव्य केले. तुर्कीकडून यापूर्वी सातत्याने निर्वासितांचे लोंढे घुसविण्याची धमकी देण्यात आली असून गेल्या काही आठवड्यांमध्ये बेलारुसमधूनही निर्वासितांची घुसखोरी वाढल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रियन मंत्र्यांची मागणी महत्त्वाची ठरते.

युरोपिय महासंघाने कारवाई‘तुर्की, बेलारुस व अफगाणिस्तान यासारखे देश निर्वासितांचा वापर युरोपिय महासंघाविरोधात शस्त्रासारखा करु पहात आहेत. महासंघाने याची जाणीव ठेऊन पुढील पावले उचलायला हवीत. महासंघ व युरोपिय कमिशनने या मुद्यावर जागे होण्याची गरज आहे. महासंघ व संबंधित यंत्रणांनी आर्थिक, राजकीय अथवा व्यापारी पातळीवर जी कारवाई शक्य आहे, ती करण्यासाठी हालचाली सुरू करायला हव्यात’, अशी मागणी ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलनबर्ग यांनी केली.

इतर देश निर्वासितांचा वापर शस्त्रासारखा करून युरोपिय महासंघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब कधीही खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी दिला. अफगाणिस्तान सरकारने काही दिवसांपूर्वी युरोपिय देशांनी अफगाण निर्वासितांची हकालपट्टी काही महिन्यांकरता थांबवावी, अशी विनंती केली होती. तालिबानचे वाढते हल्ले व कोरोनाची साथ यामुळे परिस्थिती योग्य नसल्याचे कारण अफगाण सरकारकडून पुढे करण्यात आले होते.

युरोपिय महासंघाने कारवाईत्यापूर्वी बेलारुस महासंघाचा सदस्य देश असलेल्या लिथुआनियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्वासित घुसवित असल्याची माहितीही समोर आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 800 निर्वासितांनी बेलारुसमधून लिथुआनियामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यात आखाती व आफ्रिकी देशांमधील निर्वासितांचा समावेश आहे. 2020 साली लिथुआनियात फक्त 81 निर्वासित आले होते. ही बाब लक्षात घेता, बेलारुस जाणुनबुजून लिथुआनियात निर्वासितांचे लोंढे घुसवित असल्याचा आरोप लिथुआनिया सरकारकडून करण्यात आला आहे.

लिथुआनियाच्या सरकारने बगदाद व इस्तंबूल या शहरातून बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये येणार्‍या विमानांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधले आहे. त्याचवेळी रशिया व बेलारुस हे संगनमताने निर्वासितांची तस्करी करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोपही केला आहे. निर्वासितांचे हे लोंढे रोखण्यासाठी लिथुआनियाने सीमेवर नवे कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून अतिरिक्त सुरक्षादलेही तैनात केली आहेत. युरोपिय महासंघाने बेलारुसवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी निर्वासितांच्या लोंढ्याचा वापर करण्यात येत असल्याचा दावा लिथुआनियाने केला आहे.

याआधी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी महासंघावर दबाव टाकण्यासाठी वारंवार निर्वासितांचे लोंढे युरोपवर सोडण्याची धमकी दिली होती. गेल्या वषी ग्रीसबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कीने हजारो निर्वासितांना ग्रीसच्या दिशेने मोकळे सोडल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सेबॅस्टियन कर्झ यांनी गेल्या वर्षी तुर्कीवर यासंदर्भात उघड आरोपही केले होते. या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply