नाटोच्या सायबर सुरक्षा गटात सहभागी झालेल्या दक्षिण कोरियाला चीनचा इशारा

बीजिंग – नाटोच्या सायबर सुरक्षा गटात सामील होणारा दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश ठरला. यामुळे जागतिक सायबर सुरक्षेचा दर्जा उंचावेल, असा दावा दक्षिण कोरियाने केला. पण यावर चीनची प्रतिक्रिया उमटली आहे. ‘जर युक्रेनचे नाटोत सहभागी होणे रशियामध्ये असुरक्षिततेची भावना भडकावू शकते. तर मग दक्षिण कोरियाच्या नाटोतील सहभागावर चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या शेजारी देशांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होईल व या क्षेत्रात अशांतता वाढेल’, असा इशारा चीनच्या मुखपत्राने दिला. नाटोच्या या हालचालींमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अस्थैर्य निर्माण होईल, असे या मुखपत्राने बजावले.

नाटोच्या सायबर सुरक्षा गटातदक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी-एनआयए’ या सुरक्षा यंत्रणेने नाटोच्या सायबर सुरक्षा गटातील दक्षिण कोरियाच्या समावेशाची माहिती दिली. नाटोने ‘कोऑपरेटिव्ह सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्ससी-सीएसडीसीओई’ या गटामध्ये दक्षिण कोरियाला सामील केले आहे. नाटोच्या या निर्णयावर चीनच्या सरकारी मुखपत्राने जोरदार टीका केली आहे. ‘दक्षिण कोरियाला नाटोत सहभागी करण्याचा प्रयत्न या क्षेत्रातील देशांना चीन आणि रशियाविरोधात उभे करू शकतो. तसेच यामुळे क्षेत्रीय भूराजकीय घडामोडींमध्ये पाश्चिमात्य देशांचा हस्तक्षेप वाढेल’, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला.

तर दक्षिण कोरियाला नाटोच्या सायबर सुरक्षा गटात सामील करण्याचा निर्णय अमेरिकाच्या योजनेचा मोठा भाग ठरतो, असा दावा चीनमधील वरिष्ठ लष्करी विश्लेषक साँग झाँगपिंग यांनी चिनी मुखपत्राशी बोलताना केला. ‘अमेरिकेला चीन किंवा रशियाविरोधातील प्रत्यक्ष युद्ध जिंकायचे असेल किंवा वर्चस्व मिळवायचे असेल तर त्यासाठी या दोन्ही देशांबाबतची गोपनिय माहिती मिळविणे अमेरिकेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाचा नाटोतील हा सहभाग अमेरिकेच्या या योजनेचा भाग ठरतो’, असे झाँगपिंग यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सुक-येओल देखील अमेरिकेबरोबरचे लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक आहेत, याकडे झाँगपिंग यांनी लक्ष वेधले.

नाटोच्या सायबर सुरक्षा गटात

अशा परिस्थितीत दक्षिण कोरिया नाटोच्या लष्करी गटात सामील झाला किंवा या देशाने नाटोबरोबरचे सहकार्य वाढविले तर यामुळे दक्षिण कोरियाच अधिक असुरक्षित होईल, असा इशारा चीनच्या लष्करी विश्लेषकांनी दिला. दक्षिण कोरियाने शेजारी देशांबरोबर सौहार्द आणि विश्वास प्रस्थापित केला, तरच दक्षिण कोरियाच्या सुरक्षेची हमी देता येईल, अशी धमकी झाँगपिंग यांनी दिली. यासाठी चीनच्या लष्करी विश्लेषकांनी नाटोत सहभागी असलेल्या युरोपिय देशांचा दाखला दिला.

‘नाटोमध्ये सहभागी असलेले बहुतांश युरोपिय देश सध्या कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जात आहेत. या देशांची साधनसंपत्ती मर्यादित झाली आहे. अशा परिस्थितीत नाटोचा आशियाई देशांमध्ये विस्तार झालाच तर त्याचा ब्रिटनसारख्या काही देशांनाच फायदा होईल’, असा दावा झाँगपिंग यांनी केला.

leave a reply