रशियन ‘ऑईल बॅन’च्या पार्श्वभूमीवर ओपेककडून इंधन उत्पादनात नाममात्र वाढ करण्याची घोषणा

रियाध – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघाने रशियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी टाकण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर तेल उत्पादक देशांची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’ने आपल्या उत्पादनात नाममात्र वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सहून अधिक प्रमाणात वाढेल, असे ओपेकने जाहीर केले. मात्र ओपेकने जाहीर केलेली वाढ रशियन इंधनाची कमतरता भरून काढू शकत नाही, असे विश्लेषकांनी बजावले आहे. दरम्यान, महासंघाने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यास पूर्व जर्मनीत पेट्रोलची टंचाई निर्माण होईल, अशी भीती स्थानिक नेत्यांनी वर्तविली आहे.

उत्पादनात नाममात्र वाढगुरुवारी तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ची बैठक पार पडली. या बैठकीत जून महिन्यापासून ओपेकचे सदस्य देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 4,32,000 बॅरल्सने वाढ करतील, असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना नायजेरिया व अंगोला यासारख्या देशांना उत्पादनाचा कोटा वाढवून देण्यात आला आहे. पण ओपेकचा हा निर्णय रशियाची कमतरता भरुन काढणारा नसल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

उत्पादनात नाममात्र वाढरशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून प्रतिदिन सुमारे 10 लाख बॅरल्सहून अधिक तेलाची कमतरता निर्माण झाली आहे. युरोपने रशियन आयात बंद केल्यास त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ओपेकने फक्त चार लाख बॅरल्सची केलेली वाढ कच्च्या तेलाचे दर तसेच कमतरतेवर परिणाम करु शकणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिका व युरोपने ओपेकवर सातत्याने दबाव टाकल्यानंतरही या देशांनी आपला निर्णय न बदलल्याने पुढील काळात ओपेक व पाश्चिमात्य देशांमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

दरम्यान, शेल या आघाडीच्या इंधन कंपनीने युरोपात रशियन इंधनवायूला पर्याय नसल्याची कबुली दिली आहे. शेल ही ब्रिटीश कंपनी असून ब्रिटनने रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी घातली आहे. मात्र आफ्रिकेसह इतर देशांमधून वाढविण्यात येणारी आयात आणि ‘एलएनजी’ची वाढती खरेदी या गोष्टी युरोपातील रशियन इंधनाची जागा घेऊ शकत नाहीत, असे ‘शेल’चे प्रमुख बेन व्हॅन ब्युर्डन यांनी सांगितले.

leave a reply