येत्या दशकभरात अमेरिकेला मागे टाकून चीन अंतराळक्षेत्रातील महासत्ता बनेल

- ‘२०२२ स्टेट ऑफ स्पेस इंडिस्अिल बेस’ अहवालातील इशारा

अंतराळक्षेत्रातील महासत्तावॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेची अंतराळक्षेत्रातील दुरावस्था संपविण्यासाठी तातडीची पावले उचलली नाहीत, तर चीन येत्या दशकभरात अमेरिकेला मागे टाकून अंतराळक्षेत्रातील महासत्ता बनेल असा इशारा अमेरिकी अहवालात देण्यात आला आहे. ‘डिफेन्स इनोव्हेशन युनिट’, ‘एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरी’ व ‘स्पेस फोर्स’ या तीन विभागांनी एकत्र येऊन ‘२०२२ स्टेट ऑफ स्पेस इंडिस्अिल बेस’ अहवाल सादर केला. त्यात चीनने अनेक वर्षांपूर्वीच अंतराळक्षेत्रात लष्करी व आर्थिक वर्चस्व मिळविण्याचा ‘ग्रँड प्लॅन’ तयार केल्याचे बजावले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अमेरिकी अंतराळक्षेत्राला प्रशासकीय अनास्था व इतर अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला.

अंतराळक्षेत्रातील महासत्ता‘तीन, पाच किंवा दहा वर्षांसाठी नाही तर संपूर्ण २१ व्या शतकाचा विचार करून अमेरिकेने अंतराळक्षेत्रासाठी धोरण आखण्याची गरज आहे. अंतराळक्षेत्र व अमेरिकेचे या क्षेत्रातील भविष्य हे धोरणाचे सूत्र असेल. दीर्घकालिन दृष्टिकोन ठेवला तरच अमेरिका अंतराळक्षेत्रातील यशाचा आराखडा तयार करु शकते’, या शब्दात ‘डिफेन्स इनोव्हेशन युनिट’चे वरिष्ठ अधिकारी स्टिव्ह बुटोव यांनी अहवालामागची भूमिका स्पष्ट केली. ‘२०२२ स्टेट ऑफ स्पेस इंडिस्अिल बेस’ या अहवालात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या काळातील ‘नॉर्थ स्टार व्हिजन’चा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी करून चीनच्या अंतराळक्षेत्रातील प्रभावाला शह देता येईल, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले.

अंतराळक्षेत्रातील महासत्ताचीन अंतराळक्षेत्रात अमेरिकेपेक्षा पाच ते सहा पट वेगाने तंत्रज्ञान विकसित करून त्याची अंमलबजावणी करीत आहे. अंतराळात उपग्रह जॅम करणे, नष्ट करणेे व उपग्रहाचे भाग वेगवेगळे करणे अशा विविध क्षमता चीनने दाखवून दिल्या आहेत, याची जाणीवही अहवालात करून देण्यात आली. चीनने अनेक दशकांपूर्वी अंतराळक्षेत्रासाठी ‘ग्रँड प्लॅन’ आखला आहे, पण अमेरिकेला अजूनही आपले वर्चस्व कायम टिकविण्यासाठी ठोस धोरण तयार करता आलेले नाही, अशी घणाघाती टीका अहवालात करण्यात आली. प्रशासकीय अडथळ्यांमुळे अमेरिका अंतराळक्षेत्रातील संशोधन व नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.

गेल्याच महिन्यात अमेरिकी अंतराळसंस्था ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनी चीन चंद्रावर मालकी हक्क सांगेल, अशा शब्दात चीनच्या कारवायांकडे लक्ष वेधले होते. तर, अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणे आणि अमेरिकेवर आघाडी मिळविणे, हा चीनच्या योजनेचा भाग असल्याचे ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’च्या अहवालात बजावण्यात आले होते.

leave a reply