तैवानमध्ये दाखल झालेल्या अमेरिकन सिनेटरचा चीनला इशारा

तैवानमध्ये दाखलतैपेई – ‘तैवान हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेचा भक्कम भागीदार आहे. त्यामुळे सिनेटच्या प्रतिनिधीमंडळाची तैवान भेट ही अमेरिकेच्या दीर्घकालिन धोरणाचा भाग ठरते. चीनच्या धमक्यांना घाबरुन मी तैवान भेटीतून माघार घेणार नाही’, अशा शब्दात तैवानमध्ये दाखल झालेल्या अमेरिकन सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांनी चीनला फटकारले.

अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्यानंतर मार्शा ब्लॅकबर्न ह्या तैवानला भेट देणाऱ्या तिसऱ्या अमेरिकन सिनेटर ठरल्या आहेत. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी अमेरिकन सिनेटर मार्शा यांचे स्वागत केले. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर असलेल्या मार्शा यांनी तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वेलिंग्टन कू यांचीही भेट घेतली. अमेरिका व तैवानमधील सुरक्षा, आर्थिक आणि व्यापारी सहकार्यावर चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो.

तैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असून इतर कुठल्याही देशाने तैवानबरोबर राजनैतिक व लष्करी सहकार्य प्रस्थापित करू नये, असे चीनचे म्हणणे आहे. कुणी असे प्रयत्न केलेच, तर त्याची किंमत चुकती करावी लागेल, अशा धमक्याही चीन देत आहे. त्याची पर्वा न करता अमेरिकन नेते तैवानचे दौरे करीत आहेत. पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवानच्या भोवती सहा ठिकाणी युद्धसराव सुरू केला होता. मार्शा ब्लॅकबर्न यांच्या तैवान भेटीला देखील योग्य प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने दिला आहे.

दरम्यान, येत्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तैवानच्या भेटीवर येणार आहेत. पॉम्पिओ हे तैवानचे मोठे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीने चीनची अस्वस्थता अधिकच वाढणार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply