चीनची आक्रमकता वाढत चालली आहे

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

आक्रमकतानवी दिल्ली – ‘२०२० साल अत्यंत महत्त्वाचे ठरले. या वर्षात कोरोनाच्या साथीमुळे जगभरात लाखोजणांचा बळी गेला. अशा काळात भारत आपल्या युद्धखोर शेजारी देशाच्या विरोधात खडा ठाकला आणि भारताने या देशाची कुटिल कारस्थाने हाणून पाडली. म्हणूनच पूर्वी कधीही नव्हती, इतक्या प्रमाणात लष्कराच्या कायापालटाची गरज निर्माण झालेली आहे’, असे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. त्याचवेळी चीनची आक्रमकता कमी झालेली नसून त्यात वाढ होत असल्याचा इशारा संरक्षणदलप्रमुखांनी दिला.

Advertisement

चीनच्या सरकारशी निगडीत असलेल्या हॅकर्सच्या गटांनी भारतावर सायबर हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याबाबत केले जाणारे आरोप चीनने नाकारले आहेत. पण चीनचे हॅकर्स भारताच्या सायबर क्षेत्राला लक्ष्य करीत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. या दरम्यान भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी उत्तरेकडील युद्धखोर शेजारी देश असा उल्लेख करून चीनच्या आक्रमक डावपेचांपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढत चालली आहे. याद्वारे चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असून भारताच्या शेजारी देशांवर प्रभाव टाकण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे, असे संरक्षणदलप्रमुख म्हणाले.

सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना संरक्षणदलप्रमुखांनी संरक्षण क्षेत्रात सुधारणांची फार मोठी आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्याचा दाखला देताना पाकिस्तानसह चीनच्या घातक डावपेचांवर संरक्षणदलप्रमुखांनी प्रकाश टाकला.

पारंपरिक युद्धाच्या आघाडीवर भारताने आपली क्षमता विकसित केली आहे. भारताने आण्विक क्षमताही प्राप्त केली आहे. पण बदलत्या काळाच्या गरजेनुसार याची फेररचना करणे भाग पडेल. आत्ताच्या डिजिटल क्षेत्राचीही युद्धभूमी बनली आहे, याचा दाखला देऊन संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी या आघाडीवर देशाला क्षमता विकसित करावी लागेल, असे स्पष्ट केले.

गेल्या वर्षापासून चीनच्या हॅकर्सनी भारताच्या सायबर क्षेत्रावरील हल्ले तीव्र केल्याचे समोर येत आहे. भारत सरकारने अधिकृत पातळीवर याची घोषणा केलेली नसली, तरी चीनच्या सायबर आक्रमकतेत वाढ होत असल्याची नोंद पाश्‍चिमात्य माध्यमांनीही केली आहे. अमेरिकन सिनटर्सने आपल्या देशाच्या सरकारकडे भारताच्या सुरक्षेसाठी अधिक सक्रीय भूमिका स्वीकारण्याची मागणी केली आहे.

पुढच्या काळात चीनची या आघाडीवरील आक्रमकता कमी होण्याची शक्यता नाही. उलट अपारंपरिक युद्धतंत्राचा वापर करून चीन भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणदलप्रमुखांनी चीनकडून भारताच्या सुरक्षेला असलेल्या या धोक्याचा थेटपणे केलेला उल्लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो.

leave a reply