भारताचे परराष्ट्रमंत्री बांगलादेशच्या भेटीवर

परराष्ट्रमंत्री

ढाका – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बांगलादेशच्या दौर्‍यावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मार्च रोजी बांगलादेशला भेट देणार आहेत. त्या भेटीची पूर्वतयारी करण्यासाठी आपण बांगलादेशमध्ये आल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले. पुढच्या दोन दशकात भारत व बांगलादेशने एकमेकांना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे घट्टपणे जोडून घेण्याचे ध्येय समोर ठेवावे, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील देशांच्या या महत्त्वाकांक्षेला जपानसारख्या देशाचे सहाय्य मिळू शकते, याकडेही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

Advertisement

बांगलादेशच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ व २७ मार्च रोजी बांगलादेशचा दौरा करणार आहेत. याची जोरदार तयारी सुरू झाली असून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची बांगलादेश भेट हा या पूर्वतयारीचा भाग ठरतो. गेल्या ५० वर्षाच्या कालावधीत भारत-बांगलादेशच्या सहकार्याचा काळ मागे पडलेला आहे. आता भविष्याचा विचार करून पुढच्या २० वर्षासाठीचे ध्येय निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांद्वारे भारत व बांगलादेशाने परस्परांना घट्टपणे जोडून घेण्याची गरज आहे. उभय देशांनी हे उद्दिष्ट समोर ठेवावे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.

शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणाचे केंद्र बांगलादेश होता. आता भारताने स्वीकारलेल्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणातही बांगलादेशला मध्यवर्ती स्थान आहे. बांगलादेश अत्यंत महत्त्वाचा शेजारी व भागीदार देश असल्याचे भार मानतो. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बांगलादेशचे स्थान महत्त्वाचे असल्याचे भारताचे म्हणणे आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. भारत व बांगलादेशच्या या सहकार्याला जपान अधिक गती देऊ शकतो. कारण जपान हा भारत व बांगलादेशाचाही मित्रदेश आहे, असे जयशंकर यांनी सुचविले. भारत-बांगलादेश व जपानमध्ये असे त्रिपक्षीय सहकार्य प्रस्थापित झाले तर बंगालच्या उपसागराचा चेहरामोहराच पालटून जाईल, असा विश्‍वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

leave a reply