अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सौदीबाबतच्या धोरणांवर फेरविचार करीत आहेत

- व्हाईट हाऊसचा संदेश

फेरविचारवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अद्याप इस्रायलच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केलेली नाही. पण राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यात लवकरच चर्चा होईल, असा खुलासा व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी केला. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करणार नाहीत, सौदीबाबतच्या धोरणावर फेरविचार केला जात आहे, असे लक्ष वेधून घेणारे विधान साकी यांनी केले. बायडेन प्रशासनाच्या सौदीविषयक धोरणात होत असलेल्या बदलांचे संकेत साकी यांच्या या विधानातून मिळत आहेत.

आपल्या निवडणूक प्रचारात ज्यो बायडेन यांनी अमेरिकन दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक ‘जमाल खाशोगी’ यांची हत्या घडविणार्‍या सौदी अरेबियाला एकाकी करून टाकण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यानंतर ज्यो बायडेन सौदी अरेबियाची कोंडी करण्याच्या दिशेने पावले टाकू लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी येमेनमधील अन्सरुल्लाह या गटाला दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घोषित केला होता. हा निर्णय येमेनवर हल्ले चढविणार्‍या सौदी अरेबियाच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून इराणने याचे स्वागत केले आहे.

फेरविचारपुढच्या काळात बायडेन प्रशासन सौदी अरेबियाला असेच काही धक्के देणारे निर्णय घेईल, असा दावा केला जातो. विशेषतः खशोगी यांच्या हत्येशी निगडीत अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’कडील माहिती उघड करण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केली आहे. याद्वारे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना अडचणीत टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न बायडेन यांच्या प्रशासनाकडून केला जाईल, असे काही पत्रकार व विश्‍लेषक सांगू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना या पदावरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करणार का? अशी चर्चाही अमेरिकेत सुरू झालेली आहे.

अमेरिकेचे सिनेटर्स ब्रिटनसारख्या आपल्या सहकारी देशांना सौदीने येमेनमध्ये छेडलेल्या युद्धाच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारण्याचे आवाहन करू लागले आहेत. अमेरिकेतील सुमारे ९९ स्वयंसेवी संस्थांनी येमेनमधील जनतेवर हल्ले चढवून भयंकर मानवी आपत्तीला कारणीभूत ठरलेल्या सौदी व युएई या देशांना शस्त्रास्त्रे पुरवू नका, अशी मागणी सुरू केली आहे. याला अमेरिकन माध्यमांकडून दिली जाणारी प्रसिद्धी व बायडेन प्रशासनाकडून या आघाडीवर सुरू झालेल्या हालचाली पुढच्या काळात सौदीवरील अमेरिकेचे दडपण प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत देत आहेत.

असे असले तरी राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना हटवून त्यांच्याजागी दुसरा कुणी आणतील, या भ्रमात राहू नका, असे काही पत्रकार बजावत आहेत. मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या दोन वर्षात सौदीच्या सत्तेवरील आपली पकड भक्कम केली आहे. त्यांना या पदावरून खाली खेचणे बायडेन यांना शक्य होईल, असे वाटत नाही. सध्या सौदीने रशिया व चीन या देशांबरोबरील संबंध विकसित केले असून याद्वारे अमेरिकेच्या दडपणाचा मुकाबला करण्याचे धोरण सौदीकडून स्वीकारले जाऊ शकते, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मागे न लागता, बायडेन यांचे प्रशासन सौदीकडून आपले हितसंबंध जपण्यासाठी प्रयत्न करतील, असा निष्कर्ष या पत्रकारांनी नोंदविला आहे. तर अमेरिकन माध्यमांमधील एक गट राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीवर टाकलेल्या दडपणाचे परिणाम दिसू लागल्याचे सांगून त्यावर समाधान व्यक्त करताना दिसत आहे. पुढच्या काळात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीवरील हे दडपण कायम ठेवावे, अशी मागणी माध्यमातल्या या गटाकडून केली जात आहे.

इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर सौदी इतर आखाती देश इस्रायलबरोबर सहकार्य करू लागले आहेत. ही बाब अमेरिकेच्या आखातातील हितसंबंधांसाठी घातक ठरेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे विरोधक देत आहेत. त्यातच इराणबरोबरील अणुकराराचे समर्थन करणारे फ्रान्स, जर्मनी व ब्रिटन यांनी आता इराणच्या विरोधात भूमिका स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एकाच वेळी आखाती व युरोपिय देशांच्या आघाडीचा सामना करून सौदी अरेबियात आपल्याला हवे ते बदल घडवून आणण्याचे आव्हान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासमोर खडे ठाकल्याचे संकेत मिळत आहेत. सौदी अरेबियाबाबतचे धोरण आखताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाला यावर आखात व युरोपिय देशांची तीव्र प्रतिक्रिया उमटणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल, असे दिसते.

leave a reply