निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देत चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून निदर्शकांवर कारवाईचा बडगा

हाँगकाँगच्या जनतेचे निदर्शनांना समर्थन

China's Communist regimeबीजिंग/शांघाय – ‘झीरो कोविड पॉलिसी’ विरोधात उसळलेला असंतोष नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सलग चार दिवस सुरू असणारी निदर्शने रोखण्यासाठी चीनने राजधानी बीजिंगसह मोठ्या शहरांमधील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्याचवेळी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन कोरोना काळातील निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या राजवटीकडून या हालचाली सुरू असतानाच हाँगकाँगमधील जनतेने ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधातील आंदोलनाला समर्थन दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

China's Communist-1काही महिन्यांपूर्वी चीनचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शांघाय शहरातील कोरोनाच्या उद्रेकावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर चीन ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करेल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व त्यांच्या निकटवर्तिय नेत्यांनी या धोरणाचे आक्रमक शब्दात समर्थन केले होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चीनमधील कोरोनाचा उद्रेक व रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत होते. यामुळे जनतेतील नाराजी वाढत मोठ्या प्रमाणात वाढत होती. गेल्या आठवड्ययात झिंजियांगमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर चिनी जनतेतील नाराजीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. देशातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमधून जनता रस्त्यावर उतरली व कोरोनाच्या निर्बंधांसह ते लागू करणाऱ्या कम्युनिस्ट राजवटीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. ही बाब चीनच्या सत्ताधाऱ्यांसाठी अनपेक्षित ठरली.

hong kong protestsत्यामुळे निदर्शकांवर कारवाईचा बडगा उगारतानाच ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचे संकेतही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून देण्यात आले आहेत. नवी निदर्शने होऊ नयेत म्हणून चीनने राजधानी बीजिंग व शांघायमध्ये सुरक्षादलांची तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्याचवेळी निदर्शकांना घराघरात जाऊन शोधण्याची मोहिमही सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावरून फिरणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल्स चेक करण्यात येत असून त्यातील निदर्शनांचे फोटोग्राफ्स उडवून टाकण्यास भाग पाडण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. या मुद्यावरून सुरक्षायंत्रणा व नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. निदर्शनांचे केंद्र बनलेल्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना घरी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चीनच्या सरकारी यंत्रणा तसेच वृत्तसंस्थांनी ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. राजधानी बीजिंग तसेच शांघायमध्ये नागरी वस्त्यांबाहेर उभारण्यात येणारे बॅरिकेड्स काढण्यात येतील, असा दावा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने करण्यात आला. काही शहरांमध्ये नागरिकांना ‘सोशल ॲक्टिव्हिटिज्‌‍’साठी मोकळीक देण्याची तयारीही स्थानिक प्रशासनांकडून सुरू झाली आहे. निर्बंधांमधून मोकळीक दिल्यास निदर्शने थांबतील, असा विश्वास चीनच्या सरकारी दैनिके व वृत्तसंस्थांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याची माहितीही चिनी यंत्रणांनी दिली.

दरम्यान, चीनमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांना हाँगकाँगमधून समर्थन मिळाल्याचे समोर आले आहे. सोमवारी हाँगकाँगमधील नागरिकांनी ‘ब्लँक पेपर’ फडकावून कोरोना निर्बंधांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply