‘साऊथ चायना सी’वरील चीनचे अतिशयोक्तीपूर्ण दावे वाहतुकीच्या सुरक्षेसाठी घातक ठरतील

अमेरिकन नौदलाची टीका

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘साऊथ चायना सीच्या क्षेत्रावर चीनने सांगितलेला अतिशयोक्तीपूर्ण दावा या क्षेत्रातील देशांचे आर्थिक हितसंबंध, व्यापार तसेच सागरी व हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक ठरते’, असा इशारा अमेरिकन नौदलाने दिला. काही तासांपूर्वी ‘युएसएस चॅन्सलरविले’ या अमेरिकन विनाशिकेने या सागरी क्षेत्रातील स्प्रार्टले द्वीपसमुहाजवळून प्रवास केला. यानंतर चीनने धमकावून अमेरिकी विनाशिकेला माघार घेण्यास भाग पाडले होते. यावर अमेरिकन नौदलाकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

jinping us warship south seaअमेरिकेच्या सातव्या आरमारात गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या ‘युएसएस चान्सलरविले’ या विनाशिकेने मंगळवारी सकाळी साऊथ चायना सीमधील स्प्रार्टले द्वीपसमुहाजवळून गस्त घातली. २०१६ सालानंतर सदर विनाशिकेने या सागरी क्षेत्रातून प्रवास केला. सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून आपली विनाशिका या क्षेत्रातून गस्त घालत होती, अशी माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली. पण चीनच्या लष्कराने अमेरिकन नौदलाचे हे आरोप फेटाळले आहेत.

अमेरिकेच्या विनाशिकेने कोणत्याही परवानगीशिवाय चीनच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली. चीनच्या भूभागाचा हिस्सा असलेल्या बेटांजवळून अमेरिकेच्या विनाशिकेची ही गस्त चीनचे सर्वभौमत्त्व आणि सुरक्षेचे गंभीर उल्लंघन करणारी ठरते, असा आरोप चीनच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल तियान जुन्ली यांनी केला. साऊथ चायना सीच्या स्थैर्यासाठी चीन बांधिल असून यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यासही चीन मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा चीनने दिला.

अमेरिकेच्या नौदलाने चीनचे हे आरोप फेटाळले. तसेच चान्सलरविले विनाशिकेबाबत चीनने केलेले आरोप खोटे आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रावर अमर्याद दावा ठोकणाऱ्या देशांना अमेरिकेने नेहमीच आव्हान दिले आहे, असे सांगून अमेरिकेच्या नौदलाने चीनला बजावले. तसेच साऊथ चायना सीच्या क्षेत्रावर चीनने भरमसाट दावा सांगितल्याचा आरोप नौदलाने केला. चीनची ही दादागिरी या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई वाहतुकीच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे अमेरिकन नौदलाने स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात जी२०च्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीनंतर साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिका व चीनच्या नौदलातील हा पहिला वाद ठरतो.

leave a reply