ब्रिटन-चीन संबंधांचे सुवर्णयुग संपले आहे

पंतप्रधान ॠषी सुनक यांचा इशारा

Uk-China-relationलंडन/बीजिंग – ‘ब्रिटनने चीनसंदर्भातील आपले धोरण बदलण्याची गरज आहे. ब्रिटन-चीन संबंधांमधील सुवर्णयुग आता संपले आहे आणि याबद्दल कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. व्यापार वाढवून सामाजिक व राजकीय सुधारणा घडविता येतील, हा समजही दूर करण्याची गरज आहे. चीन हा ब्रिटनची मूल्ये व हितसंबंधांसाठी मोठे आव्हान ठरतो आहे. चीनची वाटचाल अधिकाधिक एकाधिकारशाहीच्या दिशेने होत आहे. निदर्शने करणाऱ्या आपल्या जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी चिनी राजवट त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारताना दिसते. बीबीसीच्या पत्राकाराविरोधातही चीनने हेच केले’, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान ॠषी सुनक यांनी पुढील काळात दोन देशांमधील संबंध पूर्वीप्रमाणे राहणार नसल्याचे बजावले.

सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र धोरणातील बदल अधोरेखित केले. युक्रेनला सहाय्य, रशिया व चीनविरोधात आक्रमक भूमिका व इंडो-पॅसिफिकमधील सहभाग वाढविणे यावर आपण अधिकाधिक भर देणार असल्याचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्रिटन सरकार चीनबरोबरील धोरणात बदल करीत असतानाच, शीतयुद्धाच्या कालावधीप्रमाणे टोकाची भूमिका घेणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र इतर मित्रदेशांचे सहाय्य व धोरणात्मक निर्णय यांच्या आधारावर चीनच्या आव्हानाचा मुकाबला करणार असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नमूद केले. ब्रिटनच्या तंत्रज्ञान तसेच अणुऊर्जा क्षेत्रातील चीनची गुंतवणूक रद्द केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Uk-China relationsचीनविषयक धोरणांमध्ये बदल करतानाच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबरचे सहकार्य वाढविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान सुनक यांनी दिले. यात भारताबरोबरील मुक्त व्यापार कराराबरोबरच इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया व जपान यासारख्या देशांबरोबरील वाढत्या सहकार्याचा उल्लेख ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला. गेल्या दोन दशकांमध्ये ब्रिटनने चीनबरोबरील व्यापारी तसेच गुंतवणूकविषयक सहकार्य वाढविण्यावर भर दिला होता. ब्रिटनच्या नेतृत्त्वाने चीनच्या कलाने जाणारे अनेक निर्णय घेतले होते. हा काळ ब्रिटन व चीनच्या संबंधांचा सुवर्णकाळ असल्याचे वक्तव्य ब्रिटन तसेच चीनच्या नेत्यांकडून करण्यात आले होते.

मात्र कोरोनाची साथ, हाँगकाँगमधील सुरक्षा कायदा व कारवाई, झिंजिआंग यासारख्या मुद्यांवरून ब्रिटन व चीनमध्ये सातत्याने खटके उडण्यास सुरुवात झाली होती. ब्रिटनने चिनी गुंतवणुकीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांवरून चीननेही नाराजी व्यक्त करीत संबंधांवर फरक पडेल, असे बजावले होते. पंतप्रधान सुनक यांच्या वक्तव्याने दोन देशांमधील चांगल्या संबंधांची अखेर झाल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे. यामुळे पुढील काळात दोन देशांमधील राजनैतिक संघर्ष अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply