बीजिंग – ‘‘चीन किंवा अन्य कुठल्याही देशात जर आपल्या मोटारी हेरगिरीसाठी वापरल्या जात असतील, तर ‘टेसला मोटर्स’ आपला उद्योग बंद करून टाकील’’, असे ‘टेसला मोटर्स’चे सीईओ एलॉन मस्क यांनी जाहीर केले. या कंपनीच्या मोटारी आपल्या देशात हेरगिरी करण्यासाठी वापरल्या जात असल्याचा आरोप चीनने केला होता. हे कारण पुढे करून चीनने आपल्या लष्करी अधिकार्यांना या मोटारी न वापरण्याचे आदेश दिले होते. त्यावर मस्क यांची ही प्रतिक्रिया आली आहे. मात्र टेसला मोटर्सवर चीनने केलेली ही कारवाई म्हणजे सदर कंपनी भारतात करीत असलेल्या गुंतवणुकीची शिक्षा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटारी तयार करणार्या टेसला मोटर्सने गेल्या वर्षी चीनमध्ये जवळपास दीड लाख मोटारींची विक्री केली होती. चीनमध्ये याची मोठी बाजारपेठ असूनही टेसला मोटर्सने भविष्यातील बाजारपेठ म्हणून उदयाला येत असलेल्या भारताकडे लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातही टेसला मोटर्सचे उत्पादन सुरू होणार असून येत्या काही महिन्यातच याची सुरूवात होईल, असे स्पष्ट झाले आहे. त्यावर चीनच्या सरकारी माध्यमांनी आदळआपट सुरू केली होती. टेसला मोटर्सच्या महागड्या गाड्या खरेदी करण्याची क्षमताच भारतीयांकडे नसल्याचे शेरे चीनच्या सरकारी माध्यमांनी मारले होते.
सरकारचेच नियंत्रण असलेल्या चीनच्या सोशल मीडियावर देखील टेसला मोटर्सच्या विरोधात मोहीम छेडून या मोटारी खरेदी न करण्याचे आवाहन केले जात होते. त्यानंतर चीनच्या लष्कराने आपल्या अधिकार्यांना टेसला मोटर्सच्या गाड्या लष्करी आस्थापनांमध्ये न आणण्याचे आदेश दिले होते. या गाड्यांचा वापर करून हेरगिरी केली जात असल्याचा आरोप चीनच्या लष्कराने केला होता. त्यावर टेसला मोटर्सचे सीईओ एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया आली आहे. चीन तसेच इतर कुठल्याही देशामध्ये आपल्या मोटारीचा वापर हेरगिरीसाठी केला जात असल्याचे उघड झाले, तर उद्योग बंद करण्याचा निर्णय घेऊ, असे सांगून मस्क यांनी चीनच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
या प्रकरणामुळे चीनची अस्वस्थता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कोरोनाची साथ पसरल्यानंतर चीन जगभरात तिरस्काराचा विषय बनला आहे. त्याचवेळी जगाची फॅक्टरी अशी ओळख बनलेल्या चीनवर पुढच्या काळात उत्पादनासाठी पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही, याची जाणीव जागतिक उद्योगक्षेत्राला झालेली आहे. म्हणूनच बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडू लागल्या असून यातील काही कंपन्यांनी भारतात गुंतवणूक सुरू केली आहे. अशा कंपन्यांमध्ये ऍपल व टेसला मोटर्ससारख्या अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे.
उत्पादन व पुरवठा साखळीसाठी भारत हा चीनला पर्याय ठरणारा देश असल्याची आंतरराष्ट्रीय चर्चा सुरू झाली आहे. या आघाडीवर जपान व ऑस्ट्रेलियासारखे देश भारताला सहकार्य करीत आहेत. यामुळे भारतात होणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अगदी कोरोनाची साथ असताना देखील भारता होणार्या थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण विक्रमी स्तरावर होते. ही बाब चीनला चांगलीच खटकत आहे. म्हणूनच ऍपल व टेसला मोटर्स सारख्या कंपन्यांना चीनकडून इशारे दिले जात आहेत. पण या कंपन्यांच्या योजनांवर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.टेसला