सौदी व मित्रदेशांचे हौथींच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले

- हौथी बंडखोरांचा मोठा नेता ठार

जोरदार हल्लेरियाध/सना – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या लष्कराने रविवारी सकाळी येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात झालेल्या हानीचे सारे तपशील हौथींनी उघड केलेलेे नाहीत. पण हौथी संघटनेचा चौथ्या क्रमांकाचा नेता ‘झकारिया अल-शमी’ ठार झाल्याची घोषणा या संघटनेने केली. मात्र तो सौदी व मित्रदेशांच्या हल्ल्यात ठार झाला का, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील हौथी बंडखोरांचे सौदी अरेबियावर हल्ले सुरू आहेत. सौदीचे इंधनप्रकल्प, लष्करी तळ तसेच नागरी ठिकाणांवरही हौथी बंडखोरांनी रॉकेट्स, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे हल्ले चढविले आहेत. सौदी तसेच अरब देशांच्या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’ने हौथींविरोधात कारवाई करण्याचे आवाहन केले होते. पण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने दहशतवादी यादीतून वगळल्यानंतर आत्मविश्‍वास दुणावलेल्या हौथीने सौदीवरील हल्ले सुरू ठेवले आहेत.

जोरदार हल्लेशनिवारी हौथी बंडखोरांनी सौदीच्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला चढविल्याचा दावा केला. या हल्ल्यात झालेल्या नुकसानाचे तपशील उघड झालेले नाहीत. पण गेल्या दहा दिवसात हौथींनी सदर विमानतळावर चढविलेला हा तिसरा हल्ला ठरतो. त्याचबरोबर सौदीच्या खमिस मुशैत शहरावरही हौथींनी ड्रोन हल्ले चढविल्याची माहिती कतारी वृत्तवाहिनीने दिली. यानंतर सौदी व अरब मित्रदेशांच्या आघाडीने रविवारी येमेनची राजधानी सना येथील हौथींच्या ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले चढविले.

सौदी व अरब मित्रदेशांच्या या कारवाईत हौथींना जबर नुकसान पोहोचल्याचा दावा सौदीची माध्यमे करीत आहेत. हे दावे सुरू असताना, हौथी बंडखोरांनी ‘झकारिया अल-शमी’चा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. हौथी संघटनेने झकारियाच्या मृत्यूचे कारण आणि वेळ घोषित करण्याचे टाळले. झकारिया या संघटनेचा चौथ्या क्रमांकाचा नेता होता. सौदीने झकारियाच्या नावावर दोन कोटी डॉलर्सचे ईनाम जाहीर केले होते. हौथीच्या संघटनेच्या दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्याची जबाबदारी झकारियावर होती. त्यामुळे या संघटनेला हा जबर धक्का असल्याचा दावा सौदीची माध्यमे करीत आहेत.

१९९० च्या दशकात येमेनमधील झैदी समुदायाला हक्क मिळवून देण्यासाठी हुसेन अल-हौथी या नेत्याने ‘अन्सर अल्ला’ ही संघटना स्थापन केली होती. येमेनच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात या संघटनेचा प्रभाव होता. अफगाणिस्तानातील तालिबानप्रमाणे या संघटनेने आपल्या प्रभावाखाली असलेल्या भागातील तरुणांना एकत्र आणून येमेनमधील राजवटीविरोधात त्यांना सशस्त्र करण्यास सुरुवात केली होती.

२००३ साली अमेरिकी लष्कराने इराकमध्ये घुसखोरी केल्यानंतर हुसेन अल-हौथीने अमेरिकेच्या विरोधात सशस्त्र उठावाची घोषणा केली. पुढच्या वर्षभरात येमेनी लष्कराच्या कारवाईत हुसेन अल-हौथी ठार झाल्यानंतर अन्सर अल्ला ही संघटना हौथी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. अब्दुलमलिक अल-हौथी या संघटनेचा नेता आहे.

leave a reply