चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला सुरक्षितता, स्वातंत्र्य व संपन्नेतवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था नको आहे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला कायद्याची चाड व सार्वभौमत्त्वाचा आदर नसलेल्या जागतिक व्यवस्थेची निर्मिती करायची आहे. त्यासाठी ते आपल्या सार्‍या क्षमतांचा वापर करून जगभरात प्रभाव वाढवित आहेत. कम्युनिस्ट पार्टीकडून निर्माण होणार्‍या व्यवस्थेत सुरक्षितता, स्वातंत्र्य व संपन्नतेला स्थान नसेल’, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला आहे. अमेरिकेतील ‘द ह्युज हेविट शो’ या रेडिओ कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीन हे या शतकातील सर्वात मोठे आव्हान असल्याचा पुनरुच्चारही केला.

२०१९ साली चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक राजनैतिक मोहीम छेडली आहे. त्याअंतर्गत गेल्या वर्षभरात चीनविरोधात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यात साऊथ चायना सी, तैवान, तिबेट, झिंजिआंग व हाँगकाँगसंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. त्याचवेळी चीनकडून होणारे सायबरहल्ले, तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्वासाठी सुरू असलेले प्रयत्न याविरोधातही अमेरिकेने आघाडी उघडली आहे.

अमेरिकेत येत्या आठवड्याभरात सत्ताबदल होणार असला तरी ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधातील आक्रमक धोरणात बदल केला नसल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. पॉम्पिओ यांनी यावेळी भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासनही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधातील धोरण कायम राखेल, असा विश्‍वास व्यक्त केला. ‘गेल्या २४० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली अमेरिकेची वाटचाल पुढे तशीच चालू रहावी, हीच अमेरिकी जनतेची मागणी असेल आणि अमेरिकेचे नेतृत्त्व करणारे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह इतरांना याची जाणीव असेल’, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी यावेळी व्यक्त केली.

पॉम्पिओ यांनी तैवान व इतर मुद्यांवर ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे समर्थनही केले. ‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीनेच वन चायना पॉलिसी व त्याच्याशी निगडीत तीन ठरावांचे पालन करण्याची गरज आहे. मात्र ते ट्रम्प प्रशासनाने तैवानबाबत घेतलेल्या निर्णयांवर अतिरंजित प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेने फक्त प्रामाणिकपणा, परस्परांचा आदर व समान भूमिकेची मागणी केली आहे आणि ती पुढेही कायम राहिल’, असे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कोरोनाव्हायरसच्या मुद्यावरही चीनला लक्ष्य केले.

‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने वर्ष उलटल्यानंतरही कोरोनाव्हायरससंदर्भातील ठोस गोष्टी सांगण्याचे टाळले आहे. कम्युनिस्ट पार्टीकडून साथीबद्दल तीन वेगवेगळे पर्याय समोर आणले गेले. या सर्व प्रकरणात ते गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र याप्रकरणी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीतून साथ केवळ चीनच्या आतूनच नाही तर हेबेई प्रांतातील वुहानमधूनच सुरू झाल्याचे उघड होत आहे’, या शब्दात पॉम्पिओ यांनी कोरोनामुळे झालेल्या हानीसाठी चीनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. चीनच्या सत्ताधारी राजवटीला याचे परिणाम भोगणे भाग पडेल, असेही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

leave a reply