पुढील दशकभरात सौदी अरेबियात सहा ट्रिलियन डॉलर्स गुंतवणूक होईल

- क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

रियाध/डॅव्होस – येत्या दशकभरात सौदी अरेबियात सहा ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्स गुंतवणूक होऊ शकते, असे भाकित क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी वर्तविले आहे. बुधवारी पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या व्हर्च्युअल बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले. ही गुंतवणूक क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन २०३०’चा भाग असल्याचे सांगण्यात येते. इंधनक्षेत्रातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर, कच्च्या तेलावर आधारलेली अर्थव्यवस्था ही सौदीची प्रतिमा बदलण्यासाठी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी, पाच वर्षांपूर्वी ‘व्हिजन २०३०’ची घोषणा केली होती.

गेल्या काही वर्षात आखातात इराण, कतार तसेच तुर्कीचा प्रभाव वाढत असल्याचे समोर आले होते. इंधनक्षेत्रातील घसरणीमुळे सौदी अरेबिया व आखातातील अरब देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठे धक्के बसले होते. याचा फायदा उचलून इराण, कतार व तुर्कीने परस्परांशी हातमिळवणी करून सौदीचे महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याच काळात इंधनाच्या मुद्यावरून रशिया व सौदी अरेबियामध्ये खटके उडाल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन २०३०’वर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली होती.

या पार्श्‍वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीत, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सहा ट्रिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीबाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते. दशकभरात होणार्‍या या प्रचंड गुंतवणुकीपैकी सुमारे ८५ टक्के गुंतवणूक सौदीच्या ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड’(पीआयएफ) व खाजगी क्षेत्राकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित गुंतवणूक आखाती देशांसह जगभरातील गुंतवणुकदारांकडून होण्याची अपेक्षा आहे, असे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले.

‘व्हिजन २०३०’अंतर्गत तंत्रज्ञान, रिन्युएबल एनर्जी, मनोरंजन, गुंतवणूक व पर्यटन या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून त्यांना सौदीत येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. सौदीच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही दिसत असून, गेल्याच महिन्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलने सौदीच्या ‘अ‍ॅराम्को’ कंपनीसोबत ‘क्लाऊड टेक्नॉलॉजी’संदर्भात करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. त्याचवेळी अंडरसी इंटरनेट केबल प्रकल्पासाठीही सौदीबरोबर बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply