भारताचे लक्ष लडाखमधून अरुणाचल प्रदेशकडे वळविण्यासाठी चीनची धडपड

नवी दिल्ली  – अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे अपहरण करुन याद्वारे भारतावर दडपण आणण्याची तयारी चीनने केली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी या पाच भारतीयांसाठी चीनची संपर्क साधण्यात आल्याची माहिती दिली होती. पण आम्ही अरुणाचल प्रदेश मानत नाही तर, तो दक्षिण तिबेट असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. लडाखच्या पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्या भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर धक्का बसलेला चीन आपली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी धडपडतो आहे. अरुणाचल प्रदेशवर दावा ठोकून चीन भारताविरोधात नवी आघाडी उघडल्याचे चित्र यासाठीच उभे करीत आहे.

अरुणाचल प्रदेश

चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयामध्ये भारताला युद्धाची आणखी एक धमकी दिली. एकदा का युद्ध सुरू झाले तर, भारताची धडगत नसेल, असे या संपादकीयात बजाविण्यात आले आहे. ’हिवाळा सुरू होण्यापूर्वी भारताने आपले सैनिक लडाखमधून मागे घ्यावें, अन्यथा कडाक्याच्या थंडीमुळे भारतीय सैन्याला जीवितहानी सोसावी लागेल. मात्र चीनने आपल्या सीमाभागात उत्तम पायाभूत सुविधा तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे चिनी जवानांना इथल्या हिवाळ्याची तितकीशी बाधा होणार नाही’, असा तर्क ग्लोबल टाईम्सने लढविला आहे.

गोबल टाईम्समार्फत भारताला धमक्या देणार्‍या चीनचेच पाय लडाखमधील कडाक्याच्या थंडीच्या भीतीने आत्तापासूनच कापू लागले आहेत. ग्लोबल टाईम्सने भारताला दिलेल्या अनाहूत सल्ल्यातूनही ही भीती व्यक्त झाली आहे. चीनचे लष्कर आपल्या जवानांना कुठल्याही प्रकारच्या वातावरणाची जुळवून घेण्यासाठी वेळ व विशेष प्रशिक्षण देत नाही. त्यामुळे लडाखमध्ये रक्त गोठवून टाकणार्‍या थंडीत आपले जवान टिकू शकणार नाहीत, याची जाणीव चीनला झाली आहे. म्हणूनच ग्लोबल टाईम्स भारताला धमक्या व माघारीचे सल्ले देत आहेत. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशची नवी आघाडी उघडून लडाखपासून भारताचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा डाव चीनने आखला आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशवर केलेल्या दाव्यामध्ये काहीही नवे नाही. उलट लडाखमध्ये भारतीय सैन्याचा सामना करण्यात आपण कमी पडत आहोत, याची अप्रत्यक्ष कबुलीच चीनने दिली आहे. तसेच भारताला युद्धाच्या धमक्या देणारा चीनच्या सामर्थ्याचा फुगा भारत-चीन सीमेवर पहिली गोळी झाडल्यानंतर फुटेल, असा टोला भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी लगावला आहे. भारतीय सैन्याचा पराक्रम आणि व्यावसायिकता याची चीनला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच आतापर्यंत चीनने गोळीबार सुरू केलेला नाही, याकडे हे माजी अधिकारी लक्ष वेधत आहेत. तसेच चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दाखवत असलेली आक्रमकता म्हणजे भारतापासून अक्साई चीनचा भूभाग वाचविण्याची धडपड असल्याचे भारताचा माजी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

भारताचे माजी अधिकारीच नाही तर, युरोप व अमेरिकेतील मान्यताप्राप्त अभ्यासगट व विद्यापीठांनी चीनचे लष्कर भारतीय सैन्याच्या झंझावातासमोर काही दिवस देखील टिकू शकणार नाहीत, असा निष्कर्ष नोंदविला आहे. ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज्’ने (ईएफएसएएस) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात लडाखच्या क्षेत्रात भारतीय सैन्य चिनी लष्करावर सहज मात करील, असा दावा केला आहे. भारताने चीनच्या विरोधात स्वीकारलेली कणखर भूमिका चीनच्या अरेरावीमुळे दबून राहणार्‍या छोट्या देशांनाही अधिक आत्मविश्वास देत आहे. यामुळे लडाखच्या क्षेत्रात घुसखोरी करुन चीन आपले अधिकाधिक नुकसान करुन घेत आहे व पुढच्या काळातही या क्षेत्रातून चीनने माघार घेण्यास नकार दिला तर चीनला सर्वच पातळ्या व आघाड्यांवर जबर हानी सोसावी लागेल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply