महाराष्ट्र वगळता देशभरात मेट्रो सेवा सुरू

- प्रवाशांसाठी कडक नियम

नवी दिल्ली – पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर देशात ‘अनलॉक ४’ अंतर्गत मेट्रो ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, नोएडा, लखनऊ आणि हैदराबाद या शहरात मेट्रो ट्रेन सेवा सुरु झाली. केंद्र सरकारने मेट्रो सेवा सुरू करताना प्रवाशांकडून सुरक्षा नियमांचे सक्तीने पालन करून घेण्याची खबरदारी घ्यावी, असे आदेश मेट्रो प्रशासनाला दिले आहेत.

मेट्रो सेवा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानुसार सर्व प्रवाशांना स्थानकात प्रवेश आणि प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना ‘आरोग्य सेतु अ‍ॅप’ वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्थानकात प्रवेशाच्या मार्गावर सर्व प्रवाशांना थर्मल स्क्रिनिंग आणि हॅण्ड सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशी लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना जवळच्या वैद्यकीय केंद्राकडे पाठविले जाईल.

प्रवाशांना मेट्रो ट्रेनमधून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. ज्यात दोन सीट्समध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी ‘येथे बसू नका’ असे स्टिकर या जागांवर लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक स्थानकांवरील ट्रेनच्या थांब्याची वेळ 10 सेकंदांनी वाढविण्यात आली आहे. मास्क न घालता स्थानकात येणाऱ्या प्रवशांना ५०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. शिवाय मेट्रो स्थानकात संसर्ग वाढू नये म्हणून टोकन काढून प्रवास करण्यास परवानगी नसेल. केवळ स्मार्ट कार्डधारकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मेट्रो सेवा

दिल्लीत सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस यलो लाइन मार्गावर फक्त काही तासांसाठी मेट्रो ट्रेन चालवण्यात येणार आहेत. ४९ किलोमीटरच्या या मार्गावर ३७ स्थानके आहेत. सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी चार ते आठ या दरम्यान मेट्रो ट्रेन्स चालवण्यात येतील. नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अ‍ॅक्वा लाइन मार्गावर मेट्रो ट्रेन सेवा सुरु केली आहे. हा मार्ग नोएडा आणि ग्रेटर नोएडा या दोन शहरांना जोडतो. या मार्गांवर सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी पाच ते नऊ दरम्यान मेट्रो ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.

चेन्नईमध्ये सुद्धा सोमवारपासून मेट्रो ट्रेन सेवा सुरु झाली आहे. बंगळुरुतही पर्पल लाइन मार्गावर आजपासून मेट्रो धावणार आहे, तर ग्रीन लाइन मार्गावर नऊ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु होईल. बंगळूरूच्या मेट्रो प्रशासनाने प्रत्येक मेट्रोमधून ४०० जणांना प्रवासाची परवानगी दिली आहे. तेलंगणातल्या हैदराबादमध्येही पहिल्या टप्प्यात मध्ये रेड लाइन मार्गावर एलबी नगर ते मियापूर मार्गावर मेट्रो ट्रेन सुरु झाल्या आहेत.

leave a reply