चीनच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे उत्पादन थंडावले

नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचा दावा

बीजिंग – कोरोनाची साथ रोखण्याचे कारण पुढे करून चीनने झिरो कोविड पॉलिसी लागू केली होती. यामुळे चिनी शहर व प्रांतातील नागरिकांना घराबाहेर न पडता एकाच ठिकाणी कोंडून ठेवले जात आहे. याचा विपरित परिणाम चीनच्या उत्पादन क्षेत्रावर झाला आहे. एकेकाळी जगाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमधील उत्पादन आता थंडावले आहे. याला जगभरातील घटलेली मागणीही कारणीभूत असल्याचे ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स-एनबीएस’ने म्हटले आहे.

Covid Policyजिनपिंग यांच्या राजवटीने गेल्या तीन वर्षांपासून लादलेली झिरो कोविड पॉलिसी चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरली आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा नवा व्हेरिअंट आल्याचे जाहीर करून चीनने झिंजिआंग, शांघायसह ३१ शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करून नागरिकांना घरामध्ये कोंडले आहे. यामुळे २३ कोटीहून अधिक जण बाधित झाले आहेत. याच काळात चीनमधील उत्पादन आणि रोजगार थंडावल्याचे ‘एनबीएस’ने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. यामुळे २०२२ च्या अखेरीस चीनचा आर्थिक वेग मंदावेल, असा दावा केला जातो.

चीनच्या अर्थव्यवस्थेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या नव्या पॉलिटब्युरोमधील विश्वासू सहकारी ‘हे लिफेंग’ यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. लिफेंग हे जिनपिंग यांच्या मर्जीतील आणि त्यांचे सहाय्यक म्हणून ओळखले जातात. पुढच्या मार्च महिन्यात लिफेंग चीनचे नवे उपपंतप्रधान म्हणून नियुक्त होतील. पण लिफेंग यांच्याकडे आर्थिक धोरण किंवा प्रशासकीय अनुभव नसल्याचे चीनविषयक विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. त्यामुळे जिनपिंग यांनी अर्थव्यवस्थेचा अभ्यास असणाऱ्यांना बाजूला करून निकटतम सहकाऱ्यांची नियुक्ती केली असली तरी त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला त्याचा अजिबात फायदा होणार नसल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

त्यातच चीनची वित्तीय तूट एक ट्रिलियन डॉलर्सजवळ पोहोचली आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच चीनची वित्तीय तूट विक्रमी स्तरावर पोहोचल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला. कम्युनिस्ट राजवटीने रिअल इस्टेट संकट टाळण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची केलेली तरतूद या वित्तीय तूटीमधील इतर कारणांपैकी एक असल्याचा दावा केला जातो.

leave a reply