चीनच्या कमांड सेंटरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍यांचा समावेश

कमांड सेंटरनवी दिल्ली – वर्षभरापूर्वी गलवानमधील संघर्षात भारताकडून चोप मिळालेल्या चीनने आपल्या लष्करी योजनांमध्ये पाकिस्तानचे सहाय्य घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनने आपल्या लष्कराच्या वेस्टर्न आणि सदर्न कमांड सेंटरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांना सामील केल्याचा दावा केला जातो. भारतीय सैन्यासंबंधी महत्त्वाची माहिती चिनी लष्कराला पुरविण्यासाठी या पाकिस्तानी अधिकार्‍यांची तैनाती झाल्याचे बोलले जाते.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या पाच थिअटर कमांड सेंटरपैकी वेस्टर्न कमांड सर्वात मोठे आहे. गेल्या वर्षापर्यंत चीनचे हे वेस्टर्न कमांड सर्वात सुसज्ज आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे दावे केले जात होते. पण गलवानमधील संघर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कारण भारताच्या विरोधात अपेक्षित यश न मिळाल्याने नाराज झालेल्या चीनच्या राजकीय नेतृत्त्वाने या वेस्टर्न कमांडचे अधिकारी चार वेळा बदलले होते. या चार अधिकार्‍यांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे निकटवर्तीय व विश्‍वासपात्र अधिकार्‍यांचाही समावेश होता.

भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराच्या डोळ्यादेखत लडाखच्या पँगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील टेकड्यांचा ताबा घेतला होता. भारताच्या स्पेशल फ्रंटिअर फोर्सेसच्या सैनिकांची ही कामगिरी पाहिल्यानंतर चीनच्या लष्करी अधिकार्‍यांचे डोळे पांढरे झाले होते. त्याचवेळी भारतीय सैन्याशी टक्कर घेण्यापेक्षा चीनच्या जवानांना लडाखच्या हवामानाशी जुळवून घेणे, हेच मोठे आव्हान वाटू लागले होते. या वातावरणात आजारी पडणार्‍या चिनी जवानांची संख्या फार मोठी होती.

यामुळे चिनी लष्कराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळेच भारतावर दडपण टाकण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करण्याची तयारी चीनने सुरू केली. पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न हा त्याचाच भाग ठरतो.

तसेच यातून चीनच्या लष्कराला लडाखचे हवामान व वातावरण यांचा अनुभव नसून यासाठी चीन पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍यांवर अवलंबून असल्याची चकीत करणारी बाब समोर येत आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याचा अधिक अभ्यास करण्याची गरज चीनला वाटू लागली आहे, ही बाब देखील लक्षणीय ठरते. भारताबरोबर अशारितीने टक्कर घेण्याची वेळ आपल्यावर ओढावेल, असा विचार याआधी चीनने केला नव्हता, हे देखील यातून उघड झाले आहे.

leave a reply