लडाखच्या एलएसीजवळ चीनच्या लष्कराने तैनाती वाढवली आहे

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

लडाख – चीनने लडाखच्या एलएसीजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केली आहे, याची नोंद लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी पुन्हा एकदा केली आहे. इथल्या चिनी लष्कराच्या हालचालींवर भारताची नजर असून आवश्यक प्रमाणात भारतानेही इथे आपले सैन्य तैनात केल्याची माहिती जनरल नरवणे यांनी दिली. त्याचवेळी या क्षेत्रात भारतीय सैन्याने ‘के९-वज्र’ या ५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणार्‍या सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफांची ‘रेजिमेंट’ या क्षेत्रात तैनात केल्याची माहिती लष्करप्रमुखांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून चीनने लडाखच्या एलएसीजवळील लष्करी तैनाती वाढविली आहे. रशियाकडून खरेदी केलेल्या ‘एस-४००’ या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या बॅटरिज् देखील चीनने या भागात तैनात केल्याची चर्चा आहे. तसेच चीनचे सरकार वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने इथल्या सीमाभागात चीनने खूप मोठ्या सुधारणा केल्याचे सांगून इथली संरक्षणसिद्धता वाढविल्याचे दावे केले होते. चीनची ही तैनाती नव्या आगळिकीची तयारी असल्याची दाट शक्यता आहे. किंवा लष्करी हालचालींचा वापर करून भारतावर दडपण टाकण्याचा आणखी एक प्रयत्न याद्वारे चीन करीत असल्याचे स्पष्ट होते.

विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीनंतर चीनच्या आक्रमकतेत अधिकच वाढ झाल्याचे दिसत आहे. याची नोंद भारताने घेतली असून लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची लडाखभेट व संरक्षणसिद्धतेची पाहणी, हा चीनला दिलेला इशारा ठरतो. आपल्या दोन दिवसांच्या या दौर्‍यात जनरल नरवणे यांनी इथल्या सज्जतेचा आढावा घेतला. तसेच भारतीय सैन्य कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जनरल नरवणे यांनी एलएसीवरील भारतीय सैन्याच्या तयारीवर समाधान व्यक्त केले.

लष्करप्रमुख जनरल नरवणे लडाखच्या भेटीवर असतानाच, ‘के९-वज्र’ या ५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणार्‍या सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफांची रेजिमेंट लडाखमध्ये तैनात करण्यात आली. या तोफा अत्यंत उंचावर असलेल्या पहाडी क्षेत्रातही तितक्याच प्रभावी मारा करतात, अशी माहिती यावेळी लष्करप्रमुखांनी दिली. यामुळे सैन्याची मारकक्षमता अधिकच वाढेल, असे सांगून भारतीय सैन्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते, असे सूचक विधान लष्करप्रमुखांनी केले.

दरम्यान, लष्करप्रमुखांच्या या लडाख भेटीतच खादीपासून तयार केलेला सुमारे एक हजार किलो इतक्या वजनाचा २२५ लांबी व १५० फूट रुंदी असलेला विशाल राष्ट्रध्वज या क्षेत्रात लावण्यात आला. महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्याने या ठिकाणी राष्ट्रध्वज लावल्याचे सांगितले जाते. याद्वारे चीनला संदेश दिला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर भारत व चीनची लडाखच्या सीमावादावर चर्चा सुरू होणार असल्याची माहिती यावेळी लष्करप्रमुखांनी दिली. दोन्ही देशांमधील सीमावादावरील चर्चेच्या आधी लष्करी दडपण वाढविण्याचे प्रयत्न चीनने याआधीही करून पाहिले होते. गेल्या १६ महिन्यात लडाखच्या सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेच्या १२ फेर्‍या पार पडल्या होत्या. याला काही प्रमाणात यश मिळालेले असले, तरी एलएसीवरील तणाव कमी झालेला नाही, याची जाणीव लष्करप्रमुखांनी याआधी करून दिली होती. सीमावाद सुटल्याखेरीज हा तणाव कमी होणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल नरवणे म्हणाले होते.

leave a reply