लडाखमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सना वायुसेनेच्या विमानांनी रोखले

नवी दिल्ली – सिक्कीम आणि लडाखमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी तिथल्या तिथेच रोखून चीनच डाव उधळून लावला होता. त्याच्याही आधी चिनी हेलिकॉप्टर्सनी लडाखचा हवाई हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे मात्र सतर्क असलेल्या भारतीय वायुसेनेने लेहमधील तळावरून लढाऊ विमाने पाठवून चिनी हेलिकॉप्टर्सना येथून माघार घेण्यास भाग पाडले. चीनने केलेल्या हवाई घुसखोरीला अशारितीने भारताने प्रत्युत्तर दिल्याचे उदाहरण कित्येक वर्षात समोर आले नव्हते, याकडे सामरिक विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

५ मे रोजी दुपारी ही घटना घडल्याची माहिती उघड होत आहे. चिनी हेलिकॉप्टर्सनी भारताची हवाई हद्द ओलांडली नसली, तरी याआधी बऱ्याच वेळेला चीनने हवाई घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळेला भारताने चीनच्या हवाई घुसखोरीच्या प्रयत्नांना आक्रमक उत्तर दिले. चीनची हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई सीमेजवळ पोहोचून घिरट्या घालू लागताच काही क्षणातच भारतीय वायुसेनेची विमाने सीमेवर पोहोचून गस्त घालू लागली. त्यामुळे चीनची लष्करी हेलिकॉप्टर्स येथूनच माघारी फिरली.

भारतीय वायुसेनेने चिनी हेलिकॉप्टर्सला या भागातून पिटाळल्यानंतर काही तासातच चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. पूर्व लडाखमध्ये पॅगोंग सरोवराजवळ घुसखोरी करणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनाही रोखले होते. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनामध्ये जबरदस्त झटापट झाली होती. सोमवारी याबाबत वृत्त समोर आले होते. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या या हिंसक संघर्षांबाबत आणखी काही तपशील देणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत.

भारत आणि चीनचे सुमारे २५० सैनिक येथे एकमेकांसमोर खडे ठाकले होते. चिनी सैनिकांना मागे ढकलण्याच्या झटापटीत चिनी सैनिकांबरोबर ६० ते ७० भारतीय जवानही जखमी झाल्याचा दावा सरकारी सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेकही झाली होती. लडाखमध्ये चीनचे हवाई आणि भूसीमेत घुसखोरीचे हे प्रयत्न भारताने उधळल्यानंतर शनिवारी सिक्किममध्ये नाकू ला खिंडीत घुसखोरीचा प्रयत्न झाला होता.

चीनने अचानक पूर्व सीमेवर चालू केलेल्या कुरापतींमागे चीनची अस्वस्थता असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. दहा दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानला गिलगिट- बाल्टिस्तानसह संपूर्ण पाक व्याप्त काश्मीर त्वरित खाली करा, असे बजवाले होते. तसेच गेल्या आठवड्यापासून भारताने पीओकेमधील हवामानाचा अंदाजही वर्तविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानबरोबर चीनही अस्वस्थ झाला असून भारताने हा भाग ताब्यात घेतल्यास आपली ‘सीपीईसी’मध्ये केलेली गुंतवणूक धोक्यात येईल याची जाणीव चीनला झाली आहे. आतापर्यंत सुमारे ५५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक चीनने ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’मध्ये केली आहे. चीनच्या महत्वाकांशी ‘बिल्ट अँड रोड इनिशिटीव्ह’ अर्थात ‘बीआरआय’ प्रकल्पाचा महत्वाचा भाग असलेला ‘सीपीईसी’ प्रकल्प पीओकेमधील गिलगिट बाल्टिस्तानमधूनच सुरु होतो. यामुळे चीन या कुरापती काढीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान संकटात आला चीनकडून पूर्व सीमेवर अशा हालचाली केल्या जातात, ही बाबही काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. हंदवारामधील चकमकीत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच भागात झालेल्या दहशवादी हल्ल्यामध्ये मिळून भारताचे आठ जवान शहीद झाले होते. यामुळे भारत बालाकोटप्रमाणे हल्ला करील ही धास्ती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमाने नियंत्रण रेषेवर गस्त घालत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याचवेळी चीनने या कारवाया सुरु केल्या आहेत. यावर विश्लेषक बोट ठेवत आहेत.

तसेच पीओकेसह अक्‍साई चीनही भारताचा अविभाज्य भाग आहे, हे भारताने स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ही बाब स्पष्टपणे मांडली होती. पीओकेबाबत भारताने स्वीकारलेल्या धोरण पाहता भारत पुढील काळात अक्‍साई चीनसाठीही प्रयत्न सुरु करेल अशी चिंता चीनला सतावत आहे.

कोरोनाव्हायरसामुळे जगभरातील प्रमुख देश चीनच्या विरोधात गेले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रोलिया, जपान आदी देशांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनचा पर्याय म्हणून भारताची निवड करण्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या अस्वस्थतेमागील हे सुद्धा एक कारण असल्याचा दावा केला जातो.

leave a reply