बचत गटाच्या महिलांनी दहा कोटी मास्क तयार केले

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ जगभरात थैमान घालत असताना मुकाबला करीत असलेल्या डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क तसेच इतर आवश्यक साहित्याचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अमेरिका तसेच युरोपमधल्या विकसित देशांना सुद्धा याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत भारतातील बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिला पुढे सरसावल्या आहेत. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुमारे दोन लाख प्रोटेक्टिव्ह गिअर्स, तीन लाख लीटर सॅनिटायझर आणि तब्बल दहा कोटी मास्क तयार करून या महिलांनी सर्वांनाच चकित केले आहे.

भारतात मार्च महिन्यात कोरोनाव्हायरसची साथ फैलावू लागल्यानंतर देशात मास्क, प्रोक्टेटिव्ह गिअर्स आणि सॅनिटायझरचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवू लागला होता. तसेच देशात मास्क, प्रोक्टेक्टिव्ह गिअर्स याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. प्रोक्टेक्टिव्ह गिअर्समध्ये एप्रन, गॉऊन, फेस शिल्ड, ग्लोव्हज, कॅप यांचा समावेश असतो. याची टंचाई जाणवत होती. यानंतर बचत गटाच्या महिलांनी अहोरात्र परिश्रम करुन आपल्या टेलरिंग कौशल्याचा वापर करून सुरक्षा कवच, मास्क इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वस्तू तयार केल्या. त्यासाठी त्यांना राज्य आणि जिल्हापातळीवरील यंत्रणांनी सहाय्य केले.

देशातल्या विविध जिल्ह्यांमधील ४००० महिलांनी कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या योध्दांसाठी संरक्षक कवच तयार केले. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढच्या काळात यामुळे बचत गटाच्या महिलांसाठी व्यवसायाचे आणखी एक दालन खुले झाल्याचे दिसत आहे.

leave a reply