लडाख, सिक्कीमनंतर हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये चीनची घुसखोरी

नवी दिल्ली – लडाख आणि सिक्कीमनंतर हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये चीनने कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात चिनी हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई सीमेत १६ ते १७ किलोमीटर आत शिरून घरट्या घालून परत गेली. या भागात गेल्या २० दिवसातील ही दुसरी घटना असल्याचे वृत्तही समोर आले आहे.

५ मे रोजी लडाखमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय वायुसेनेच्या विमानांनी तत्काळ सीमा रेषेवर पोहोचून गस्त घातल्याने ही चिनी हेलिकॉप्टर्स माघारी परतली होती. त्याच दिवशी संध्याकाळी चिनी जवानांनी लडाखमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा डाव भारतीय सैनिकांनी उधळला होता. येथे दोन्ही देशांच्या सुमारे २५० सैनिकांमध्ये जोरदार झटापटही झाली होती. यामध्ये काही सैनिक जखमी झाले होते. १० मे रोजी सिक्कीमच्या नाकू ला खिंडिंतही घुसखोरी करणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनाही रोखले हॊते. तसेच लडाखमधे डेमचोक आणि गलवान नदीजवळ चीनच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सच्या घुसखोरीचे वृत्त समोर येत आहे.

लाहौल स्पितीच्या कौरिक आणि किन्नौर भागावर चीन आपला दावा सांगतो. २०१७ साली डोकलाममध्ये भारतीय सैनिकांनी या वादग्रस्त भागात चीनचा रस्ते बांधकामाचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी उधळून लावला होता आणि ७३ दिवस चिनी जवानांसमोर भारतीय सैनिक खडे ठाकले होते, त्यावेळीही चिनी हेलिकॉप्टर्सनी या भागात घुसखोरी केली होती. भारताच्या आक्रमक धोरणामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने हिमाचल प्रदेशच्या कुरापत काढली होती. आताही चीनकडून तसाच प्रयत्न करण्यात येत आहे.

भारताच्या सीमेत घुसखोरी करून चीन लष्करी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे खरा, पण यामध्ये चीनला अजिबात यश मिळणे शक्य नाही, असा दावा भारताचे विश्लेषक करीत आहेत. काश्मीर प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन भारताने पाकिस्तानला गिलगिट- बाल्टिस्तान खाली करण्याची सूचना केली होती यानंतर पाकिस्तानबरोबर चीनदेखील भारताच्या सीमेवर लष्करी हालचाली वाढवून भारतावर दडपण टाकणार, याची जाणीव भारताच्या लष्करी नेतृत्वाला झालेली होती. त्यामुळे चीनच्या कुरापतींना उत्तर देण्याची तयारी भारताने आधीच करून ठेवली होती. म्हणूनच यावेळी सीमेवर कुरापती काढून भारतावर दबाव टाकू पाहणाऱ्या चीनवरच ही खेळी उलटल्याचे दिसत आहे, असा दावा विश्लेषक करीत आहे.

leave a reply