कोरोनाव्हायरसचा जगभरातील फैलाव अधिकच वाढला

ब्रुसेल्स – जगातील २१२ देशांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ३,१३,८८९ वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात गेलेल्या ४,३०० बळींचा यात समावेश आहे. या साथीचा फैलाव आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोरोनाव्हायरस प्रकरणी लपवाछपवी करणाऱ्या चीनवर तसेच चीनचा साथ देणाऱ्या या संघटनेविरोधात अमेरिका व मित्रदेश जोरदार हल्ले चढविण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाशी झगडत असून जगभरात या साथीच्या रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जगभरात या साथिचे ९६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेला या साथीचा सर्वाधिक फटका बसला असून गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेतील १,२३७ जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेतील या साथीत दगावलेल्यांची संख्या ९० हजारावर गेली आहे. शनिवारी अमेरिकेत या साथीच्या २५ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली.

रविवारी दुपारपर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, युरोपमध्ये या साथीचे ६०० बळी गेले. तर गेल्या चोवीस तासात २६ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिका, युरोपप्रमाणे ब्राझिलला या साथीचा जबर फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझिलमध्ये या साथीचे ८१६ बळी गेले असून सुमारे १५ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पावणे तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. ब्राझिलमधील या साथीची परिस्थिती हाताळण्यात अपयश मिळाल्याने या देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. अवघ्या महिन्याभरात ब्राझिलच्या दोन आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, येत्या काही तासात जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) सर्वसाधारण बैठक सुरू होणार आहे. या निमित्ताने अमेरिका आणि चीन आमनेसामने येतील. कोरोनाव्हायरसबाबत चीनने केलेल्या लपवाछपवीमुळेच ही साथ जागतिक महामारी बनली, असा आरोप अमेरिका करीत आहे व यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने चीनला सहाय्य केले, असा अमेरिकेच दावा आहे. त्यामुळे या बैठकीत अमेरिका व मित्रदेश आक्रमक भूमिका स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply