तालिबानकडून लिथिअमची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना अटक

तस्करीइस्लामाबाद – अफगाणिस्तानातील दुर्मीळ खनिजांची चोरी करणाऱ्या दोन चिनी नागरिकांना तालिबानने पकडले आहे. जलालाबाद शहरातून ‘लिथिअम’ची पाकिस्तानात अवैध तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या या चिनी नागरिकांना तालिबानने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १००० मेट्रिक टन वजनाचे लिथिअमचा समावेश असलेले दगड जप्त करण्यात आले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरुपाची कारवाई केली आहे.

अफगाणिस्तानात सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स इतका खनिजांचा साठा असल्याचा दावा अमेरिकन यंत्रणांनी केला होता. यामध्ये सोन्याबरोबर लिथिअमसारख्या दुर्मिळ खनिजांचा देखील यात समावेश असल्याचे समोर आले होते. या लिथिअमचा वापर रिचार्जेबल बॅटरीज्‌‍ तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. जगभरात लिथिअमची मोठी मागणी असून चीन हा याचा मोठा ग्राहक देश आहे.

अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानात तैनात असेपर्यंत या खनिजांचे उत्खनन सुरू होते. पण २०२१ साली तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानातील खनिजांचे उत्खनन तसेच विक्रीवर बंदी टाकली. गेल्या दीड वर्षामध्ये चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तालिबानशी राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानातील या खनिजांच्या उत्खननाचे कंत्राट आपल्याला मिळावे, यासाठी चीनने जोरदार प्रयत्न करून पाहिले.

अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या विकासप्रकल्पांमध्ये चीनने आपल्या नागरिकांना सहभागी केले आहे. पण अफगाणिस्तानातील खनिजांच्या उत्खननावरील बंदी तालिबानने अद्याप मागे घेतलेली नाही. आपल्या राजवटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेपर्यंत अफगाणिस्तानातील खनिजसंपत्ती देशाबाहेर जाणार नाही, असे तालिबानने जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत चीनचे दोन नागरिक अफगाणिस्तानातून लिथिअमची चोरी करीत असल्याची बातमी लक्ष वेधून घेणारी ठरते.

तालिबानच्या राजवटीत खनिज आणि इंधन मंत्री असलेला मोहम्मद रसूल अकाब या वरिष्ठ कमांडरने चिनी नागरिकांच्या या तस्करीची माहिती स्थानिक माध्यमांना दिली. अफगाणिस्तानच्या कुनार आणि नुरीस्तान प्रांतातील खाणीतून बाहेर काढलेले १००० मेट्रिक टन वजनाचे लिथिअमचा समावेश असलेले दगड पाकिस्तान सीमेतून तस्करी करण्याचा प्रयत्न या चिनी नागरिकांनी केला. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या जलालाबाद शहरात तालिबानने या चिनी नागरिकांसह पाच जणांना ताब्यात घेतले.

दरम्यान, अफगाणिस्तानातील चिनी नागरिकांवर दहशतवादी हल्ले वाढत असून तालिबानने त्यांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी चीन करीत आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे नागरिक अफगाणिस्तानातील दुर्मिळ खनिजांच्या तस्करीत सहभागी असल्याचे उघड झाल्याची बाब चीनची प्रतिष्ठा बाधित करणारी ठरते.

leave a reply