भारताने पुरविलेल्या सहाय्यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनकडून श्रीलंकेला आर्थिक सहाय्याचे आश्वासन

कोलंबो – चिनी कर्जाच्या फासात अडकल्यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य करण्याची तयारी भारताने दाखविली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या श्रीलंकेच्या दौऱ्यात ही बाब ठासून सांगितली होती. भारत आपल्या देशाला फार मोठे सहाय्य करीत असल्याचे सांगून श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यासाठी भारताकडे कृतज्ञताही व्यक्त केली आहे. यामुळे भारताचे श्रीलंकेबरोबरील सहकार्य दृढ होईल आणि श्रीलंकेवरील भारताचा प्रभाव वाढेल, या चिंतेने ग्रासलेल्या चीनला ग्रासले आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत श्रीलंकेला सहाय्य पुरविण्यासाठी आपला देश पुढकार घेणार असल्याची घोषणा चीनने केली आहे. तसेच याआधी श्रीलंकेला दिलेल्या कर्जाची फेररचना करण्याची तयारीही चीनने दाखविलेली आहे.

चीनच्या एक्झिम बँकेकडून श्रीलंकेला पत्र पाठविण्यात आले. यामध्ये श्रीलंकेने आपल्याकडून घेतलेल्या कर्जाची फेररचना करण्याची तयारी चीनच्या या बँकेने दाखविली. याआधी श्रीलंकेने अनेकवार चीनकडे तशी मागणी केली होती. पण त्यावेळी चीनने त्याला नकार दिला होता. आधीच्या काळात चीनने चढ्या व्याजदराने श्रीलंकेला प्रचंड प्रमाणात कर्ज दिले होते. पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांसाठी दिलेले हे कर्ज अव्यवहार्य आणि श्रीलंकेसाठी घातक ठरेल, असे इशारे अर्थतज्ज्ञांनी दिले. पण श्रीलंकेतील त्यावेळच्या सरकारने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

पुढच्या काळात या कर्जाच्या ओझ्याखाली श्रीलंकेची अर्थव्यवस्था दबून गेली व श्रीलंकेत अराजक माजले होते. हा देश चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या फासात अडकल्यानंतर कोलमडण्याच्या स्थितीत आला होता. चीनकडून कर्ज घेऊन श्रीलंकेला रसातळाला नेणारे नेते राजपक्षे यांच्यावर हा देश सोडून पळ काढण्याची वेळ ओढावली होती. अशा परिस्थितीत श्रीलंकेचे नवे सरकार हा देश सावरण्याचा प्रयत्न करीत असून भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य पुरवित आहे. श्रीलंकन अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता समोर दिसत असताना, चीन अस्वस्थ बनला आहे. विशेषतः भारताकडून श्रीलंकेला मिळत असलेल्या सहाय्याचे सुपरिणाम दिसू लागले असून श्रीलंकन नेते व जनता यासाठी भारताचे आभार मानत आहे. यामुळे चीनने श्रीलंकेला दिलेल्या कर्जाची फेररचना करण्याची तयारी दाखविली असून नाणेनिधीच्या कर्जसहाय्याचे गाजर देखील श्रीलंकेला दाखविल्याचे दिसत आहे.

leave a reply