चीनच्या विमानांची वर्षभरात तैवानच्या हद्दीत ३८० वेळा घुसखोरी

तैपेई – १९९०च्या दशकानंतर प्रथमच चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून, चीनच्या विमानांकडून वर्षभरात तब्बल ३८० वेळा घुसखोरी करण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री येन दे-फा यांनी दिली. गेल्या काही आठवड्यात चीनच्या विमानांकडून दोन देशांमधील ‘बफर झोन’मध्येही घुसखोरीचे प्रयत्न सुरू झाले आहेत व त्यामुळे तैवानवरील दडपण वाढल्याची चिंताही संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

३८० वेळा घुसखोरी

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने आपल्या कारवायांची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी व लष्करी अधिकारी उघडपणे तैवानवर आक्रमण करून ताबा मिळविण्याच्या धमक्या देत आहेत. चीनच्या विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका व पाणबुड्या तैवानच्या सागरी हद्दीनजिक सातत्याने सराव करीत आहेत. तैवानवरील हल्ल्यांसाठी चीनने आपले संरक्षणतळ सज्ज ठेवल्याचेही सांगण्यात येते.

त्याचवेळी चीनचे हवाईदल तैवानी संरक्षणदलांवरील दबाव वाढविण्यासाठी सातत्याने हवाईहद्दीत घिरट्या मारत आहे. चीनकडून लढाऊ विमानांबरोबरच बॉम्बर्स तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी सज्ज असणारी विमानेही तैवानच्या हद्दीत वारंवार धाडण्यात येत आहेत. नवे वर्ष सुरू झाल्यावर अवघ्या पाच दिवसात चीनच्या विमानांनी दोनदा घुसखोरी केल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षात चीनच्या विमानांनी तब्बल ३८० वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले.
चीनच्या विमानांना रोखण्यासाठी तैवानच्या विमानांना सुमारे तीन हजार वेळा भरारी घेणे भाग पडले व त्यासाठी जवळपास ९० कोटी डॉलर्स खर्च झाल्याची माहिती संरक्षणमंत्री दे-फा यांनी दिली. तैवानने चिनी विमानांना पिटाळण्यासाठी क्षेपणास्त्र यंत्रणेचा वापर केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनकडून करण्यात येणारे हे घुसखोरीचे प्रयत्न तैवानच्या संरक्षणदलांना जेरीस आणण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे दावे तैवानी तसेच पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांकडून करण्यात आले आहेत.

leave a reply