मृत्यूला न घाबरता लढण्यासाठी सज्ज रहा

बीजिंग – ‘चीनच्या लष्करातील अधिकारी व जवानांनी, खडतर परिस्थिती व मृत्यूला न घाबरता युद्धासाठी नेहमी सज्ज रहावे’, असे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. कोणत्याही क्षणाला युद्ध भडकू शकते याची जाणीव ठेवून चीनच्या लष्कराने संपूर्ण तयारी ठेवावी, असेही या आदेशात म्हटले आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवणही जिनपिंग यांनी करून दिली. गेल्या आठ महिन्यात जिनपिंग यांनी चीनच्या लष्कराला युद्धसज्जतेसंदर्भात आदेश देण्याची ही चौथी वेळ ठरते.

मृत्यूला न घाबरता

काही दिवसांपूर्वीच चीनच्या संसदेने जिनपिंग व त्यांच्या नेतृत्त्वाखालील ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’ला राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वाधिकार देणार्‍या कायद्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर जिनपिंग यांच्याकडून ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला युद्धसज्जतेचे आदेश देण्यात आल्याचे समोर आले. या आदेशात चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाच्या आघाडीवरील प्रशिक्षणावर भर देण्याची तसेच दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धसराव चालू ठेवा व युद्धासाठीची क्षमता वाढवा, असेही आदेशात म्हटले आहे.

चीनकडून भारताच्या सीमेनजिक मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात आले असून तैवानच्या हद्दीतील हालचालीही तीव्र करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांचे आदेश लक्ष वेधून घेणार ठरतात.

leave a reply