चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून लष्कराला प्रत्यक्ष युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश

अमेरिकी नेते व विश्लेषकही चीनच्या तयारीबाबत चिंतित

jinping armyबीजिंग – तैवानला घेरणाऱ्या युद्धसरावाच्या आयोजनानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला प्रत्यक्ष युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सदर्न थिअटर कमांडने चीनचा सार्वभौम भूभाग आणि सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी तयारी करावी, अशी सूचना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिली. तर चीनला हवेच असेल तर आपले लष्करही प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याची घोषणा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी केली. पण चीन लष्करी कारवाईपेक्षा तैवानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करील, असा दावा तैवानचे नेते करीत आहेत.

गेल्या आठवड्यात चीनने तैवानला घेरणारा मोठा युद्धसराव आयोजित केला होता. सलग तीन दिवसांच्या या युद्धसरावात चीनच्या विमानवाहू युद्धनौकेसह, विनाशिका, १६० लढाऊ व बॉम्बर विमानांनी सहभाग घेतला होता. यावेळी चीनची विमाने आणि विनाशिकांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. चीनच्या विमानवाहू युद्धनौकेवरुन लढाऊ विमानाने उड्डाण केल्यानंतर जपानने देखील आपल्या लष्कराला सज्ज राहण्याची सूचना केली होती. यामुळे तैवानच्या आखातात तणाव निर्माण झाला होता.

Joe Bidenसोमवारी हा युद्धसराव संपल्यानंतरही चीनच्या नऊ विनाशिका तैवानच्या हद्दीतच गस्त घालत होत्या. या विनाशिका अजूनही माघारी फिरल्या नसल्याच्या दावा केला जातो. अशा परिस्थितीत, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला उद्देशून तैवानविरोधी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांची भेट घेणारे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅकार्थी यांच्यावर चीनने निर्बंध जाहीर केले. चीनच्या या आक्रमकतेला व आपल्या वरिष्ठ सिनेटरवर लादलेल्या निर्बंधांवर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण चीनविषयक विश्लेषक आणि अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगटाचे तज्ज्ञ गॉर्डन चँग यांनी बायडेन प्रशासनाच्या या चीनविषयक भूमिकेवर जोरदार टीका केली. चीनकडून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असतानाही राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनबरोबर व्यापारी सहकार्य करीत आहेत, हे अतिशय भयाण असल्याचे ताशेरे चँग यांनी ओढले. या व्यापारातून मिळणारा पैसा चीन अमेरिकाविरोधातील युद्धासाठी आपल्या लष्करी सज्जतेवर खर्च करीत असल्याचा दावा चँग यांनी केला. तसेच तैवानबाबत भावनिक असलेला चीन कधीही, २०२५ सालाआधीच हल्ला चढवू शकतो व यामुळे अमेरिका-चीन यांच्यात युद्ध भडकू शकते, असा इशारा गॉर्डन चँग यांनी दिला.

leave a reply