चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी विश्वासार्हता गमावली

- विश्लेषकांचा दावा

बीजिंग – चीनमधील कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून त्यावर पडदा टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या वक्तव्यात, चीनची जनता कठीण परिस्थिती व आव्हानांवर मात करेल, असे आवाहन केले. मात्र जिनपिंग यांचे वक्तव्य जनतेला दिलासा देण्यात अपयशी ठरले असून त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता घसरल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. चिनी यंत्रणा व मॉडेल जगात सर्वश्रेष्ठ असल्याच्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. दरम्यान, चिनी प्रवाशांवर निर्बंध टाकणाऱ्या देशांची संख्या हळूहळू वाढू लागली असून ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया व कॅनडासारख्या देशांचाही त्यात समावेश झाला आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी ‘झीरो कोविड पॉलिसी’ लागू केली होती. त्याच्या यशाबाबत वारंवार प्रश्नचिन्हे उपस्थित होत असतानाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट राजवटीकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. गेल्या वर्षी शांघाय व इतर प्रमुख शहरांमधून नाराजीचे सूर उमटत असतानाही जिनपिंग यांनी आक्रमक शब्दात आपल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र झिंजिआंगमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेने या धोरणाविरोधात चिनी जनतेत असलेला असंतोष तीव्रपणे उफाळून वर आला होता. चीनच्या प्रमुख शहरांमध्ये जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले होते.

त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चीनने कोरोनाची साथ रोखण्यासाठी लादलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनमधील बहुतांश निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून हॉस्पिटल्स व दफनभूमींमध्ये मोठ्या रांगा लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत. कोरोनामुळे दर दिवशी चीनमध्ये एक ते पाच हजार जण दगावत असल्याचे दावे विविध माध्यमांकडून करण्यात आले आहेत.

या काळात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चिनी जनतेला दिलासा देणे तसेच शहरांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणे, आवश्यक उपाययोजना करणे या गोष्टी अपेक्षित होत्या. मात्र या सर्व कालावधीत साथीबाबत योग्य माहिती देण्याऐवजी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने पुन्हा एकदा लपवाछपवीची भूमिका घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चिनी जनतेला कोणत्याही प्रकारे संबोधित न करता गप्प राहण्याची भूमिका घेतल्याने चीनमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. जिनपिंग यांच्या या भूमिकेमुळे त्यांची प्रतिष्ठा व अधिकार या दोन्हीला तडा गेल्याचा दावा हाँगकाँगस्थित विश्लेषक विली लॅम यांनी केला. जिनपिंग व कम्युनिस्ट पार्टी अशा दोघांच्याही विश्वासार्हतेला धक्का बसल्याचे जॉन डेल्युरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ) चीनच्या यंत्रणांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारी पुरवावी, असे निर्देश दिले आहेत. तर चिनी प्रवाशांना कोरोनासंदर्भातील चाचणी सक्तीची करणाऱ्या देशांमध्ये नव्या देशांची भर पडली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेसह जपान, इटली व भारत या आघाडीच्या देशांनी चिनी प्रवाशांवर निर्बंध लादले होते. आता ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांनीही हवाईमार्गे येणाऱ्या चिनी प्रवाशांना चाचणी सक्तीची केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर चिनी माध्यमांनी नाराजी व्यक्त केली आहे.

leave a reply