इंधनवाहिनीच्या सुरक्षेसाठी म्यानमार सीमेनजिक चिनी लष्कर तैनात

नेप्यितौ/बीजिंग – चीन व म्यानमारमध्ये उभारण्यात आलेल्या इंधनवाहिनीच्या सुरक्षेसाठी चीनने म्यानमार सीमेनजिक लष्कर तैनात केले आहे. म्यानमारमधील ‘द इरावादी’ या न्यूज वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. म्यानमारला इशारा देण्यासाठी ही लष्करी तैनाती असावी, असा दावाही वेबसाईटवर करण्यात आला. म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडाच्या मुद्यावर म्यानमारच्या जनतेत चीनविरोधात तीव्र रोष असून त्याचा फटका इंधनवाहिनीला बसू शकतो, अशी भीती चीनमधून व्यक्त झाली होती. या पार्श्‍वभूमीवर लष्करी तैनातीचे वृत्त लक्ष वेधून घेणारे ठरते.

दोन महिन्यांपूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या बंडात लष्कराने लोकशाहीवादी सरकार उलथवून देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. हे बंड व त्यानंतर लष्कराकडून निदर्शकांवर सुरू असलेली कारवाई यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र चीनने ही म्यानमारची अंतर्गत बाब आहे व देशाचे स्थैर्य अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका घेतली होती. बंड होण्यापूर्वी चीन व म्यानमारच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या भेटीगाठीही लक्ष वेधून घेणार्‍या ठरल्या होत्या. जपानसह अनेक प्रमुख देशांनी म्यानमारमधील लष्करी बंडाळीमागे चीनचा हात असल्याचा दावा करून, या क्षेत्रात प्रभाव वाढविण्यासाठी चीन हालचाली करीत असल्याचे म्हटले होते.

बंडानंतर चीनच्या परराष्ट्र विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीचे निवेदन प्रसिद्ध झाले होते. त्यात चीनने म्यानमारमध्ये उभारलेला इंधनवाहिनी प्रकल्प व इतर हितसंबंधांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. चिनी प्रकल्पांना धक्का पोहोचला तर म्यानमारमधील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक धोक्यात येईल, तसेच दोन देशांमधील संबंधही बिघडतील, असे चीनकडून बजावण्यात आले होते. यावर म्यानमारच्या जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यात, म्यानमारमधून जाणार्‍या चीनच्या इंधनवाहिनीचा स्फोट होऊ शकतो, असेही बजावण्यात आले होते.

त्यानंतर म्यानमारमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये चिनी कंपन्यांचे काही कारखाने, हॉटेल्स तसेच इतर उपक्रमांना लक्ष्य करण्यात आले होते. म्यानमारमध्ये होणार्‍या निदर्शनांमध्ये सातत्याने चीनविरोधी घोषणांचे फलक झळकत असून सोशल मीडियावरूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या लष्कराने म्यानमारच्या सीमेनजिक केलेली तैनाती लक्ष वेधून घेणारी ठरते.

चीनने म्यानमारमध्ये दोन इंधनवाहिन्यांची उभारणी केली असून नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा करणार्‍या इंधनवाहिनीतून दरवर्षी सुमारे १२ अब्ज घनमीटर इंधनवायूचा पुरवठा करण्यात येतो. तर ७७१ किलोमीटरच्या ऑईल पाईपलाईनच्या माध्यमातून दर दिवशी सुमारे ४ लाख बॅरल्सहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. या इंधनवाहिनीतून म्यानमारला दरवर्षी सुमारे २० लाख टन कच्चे तेल उपलब्ध करून देण्यात येते. म्यानमार-चीन इंधनवाहिनी प्रकल्प चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट, वन रोड’ व ‘टू ओशन्स स्ट्रॅटेजी’चा भाग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याची सुरक्षा चीनसाठी महत्त्वाची ठरते.

leave a reply