लष्करी बंडाच्या संशयावरून तुर्कीत माजी नौदल अधिकार्‍यांना अटक

अंकारा – राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याविरोधातील लष्करी बंडाच्या संशयावरून तुर्कीत १० माजी नौदल अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तुर्कीतील १००हून अधिक माजी नौदल अधिकार्‍यांनी एर्दोगन यांच्या योजनेला विरोध करणारे निवदेन जारी केले होते. हे निवेदन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा व देशाच्या घटनेला धोका ठरु शकतो, असा ठपका ठेऊन नौदल अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याविरोधात २०१६ साली लष्करी बंडाचा अपयशी प्रयत्न करण्यात आला होता.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ‘ब्लॅक सी’ व ‘सी ऑफ मार्मारा’ला जोडणार्‍या ‘इस्तंबूल कॅनल’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची योजना आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास सध्या ‘ब्लॅक सी’ व ‘सी ऑफ मार्मारा’ला जोडणार्‍या ‘बॉस्फोरस सामुद्रधुनी’चे महत्त्व कमी होऊ शकते. त्याच आधारावर तुर्की १९३६च्या ‘ट्रिटी ऑफ मॉन्ट्रेक्स’मधून बाहेर पडू शकतो. ही गोष्ट तुर्की व पाश्‍चात्य देशांमधील तणाव वाढविणारी ठरु शकते, असे मानले जाते.

या पार्श्‍वभूमीवर, तुर्कीतील १००हून अधिक नौदल अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले. निवेदनात ‘ट्रिटी ऑफ मॉन्ट्रेक्स’मधून बाहेर पडणे चिंतेची बाब असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचवेळी या करारासह इतर आंतरराष्ट्रीय करारांमधून बाहेर पडण्यासंदर्भात सुरू असलेली चर्चा तुर्कीच्या हिताची नसल्याचेही सदर अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या पत्रावर तुर्की सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तुर्की सरकारने सदर अधिकार्‍यांवर ठेवलेले आरोपपत्र व १० अधिकार्‍यांना केलेली अटक त्याचाच भाग मानला जातो. आरोपपत्रात राष्ट्रीय सुरक्षा व राज्यघटनेविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख असणे अत्यंत गंभीर बाब मानली जाते. बंड अथवा देशद्रोहासंदर्भातील कारवाई करताना अशा प्रकारचा उल्लेख करण्यात येत असल्याने ही घटना खळबळ उडविणारी ठरली आहे. तुर्कीतील काही अधिकारी तसेच माध्यमांनी माजी अधिकार्‍यांचे निवेदन म्हणजे सरकारविरोधातील बंडाचा प्रयत्न असल्याची संभावना केली आहे.

तुर्कीत यापूर्वी १९६०, १९७१, १९८० व १९९७ साली लष्कराने बंड करून राजवट उलथविली होती. तर २०१६ साली एर्दोगन यांच्या राजवटीविरोधात झालेले बंड अपयशी ठरले होते. यात बंडात २५०हून अधिक जणांचा बळी गेला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी हजारो लष्करी अधिकार्‍यांवर कारवाई केली होती.

leave a reply