२०२५ सालापर्यंत चीनबरोबरच्या युद्धासाठी अमेरिकेच्या हवाईदलाने सज्ज रहावे

अमेरिकन हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

china taiwan attack mergeवॉशिंग्टन – २०२४ साली अमेरिका आणि तैवान निवडणुकीत व्यस्त असतील. या काळात अमेरिकेचे लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे नसेल. ही संधी साधून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तैवानवर हल्ले चढवतील. असे झाल्यास अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकेल. म्हणूनच या सागरी क्षेत्रातील ‘फर्स्ट आयलँड चेन’ जिंकण्यासाठी अमेरिकेच्या हवाईदलाने सज्ज रहावे, असा सूचक इशारा अमेरिकेच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी जनरल माईक मिनीहान यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या ‘एअर मोबिलिटी कमांड-एएमसी’चे प्रमुख जनरल माईक मिनीहान यांनी आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या ५० हजार जवानांना उद्देशून मेमो पाठविला आहे. यामध्ये जनरल मिनीहान यांनी ‘एएमसी’च्या विंग कमांडर्सना चीनविरोधी युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. २०२५ सालापर्यंत चीनबरोबर नक्की युद्ध पेटेल, याची आपल्याला पूर्ण खात्री वाटते, असे जनरल मिनीहान यांनी यात म्हटले आहे. तर ‘एएमसी’च्या जवानांना सात मीटर अंतरावरील लढाऊ व बॉम्बर विमानांना सहाय्य करण्यासाठी सराव करण्याची सूचना केली आहे. एएमसीच्या जवानांनी सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयार रहावे, असे जनरल मिनीहान यांनी मेमोमध्ये म्हटले आहे.

general minihanयासाठी एएमसीच्या प्रमुखांनी आपल्या जवानांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील सरावाची तयारी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ‘केसी-१३५’ विमानाला दुहेरी कामगिरीसाठी सज्ज करण्याचे जनरल मिनीहान यांनी सुचविले आहे. अमेरिकेच्या हवाईदलातील ‘एएमसी’ या विभागाकडे लढाऊ, बॉम्बर आणि अवजड मालवाहू विमानांना इंधन पुरविण्याची जबाबदारी असते. ‘केसी-१३५’ हे इंधनवाहू टँकर विमान असून त्याचा वापर हवेतून हवेत इंधन पुरविण्यासाठी केला जातो. पण जनरल मिनीहान यांनी चीनवर १०० ड्रोन्स सोडण्यासाठी देखील या टँकर विमानाचा वापर करता येईल, याकडे लक्ष वेधले आहे.

जनरल मिनीहान यांचा मेमो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एएमसीने याची कबुली दिली. पण अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यापासून फारकत घेतली आहे. जनरल मिनीहान यांनी दिलेले आदेश म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीनबाबतचे धोरण नसल्याचे विधान संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला धोका आहे, हे संरक्षण विभाग मान्य करते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र व सहकारी देशांबरोबर चर्चा करीत असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट्रिक रायडर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २०२५ सालापर्यंत तैवानवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनविरोधात तैवानला साथ द्यावी, असे आवाहन तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले होते.

leave a reply