रशियापासून असलेल्या अणुहल्ल्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष नको

- सीआयएच्या प्रमुखांचा इशारा

अणुहल्ल्याच्या धोक्याकडे दुर्लक्षमॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनमधील लष्करी मोहिमेत बसलेल्या धक्क्यांच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून अण्वस्त्रहल्ला होण्याचा धोका दुर्लक्ष करण्यासारखा नाही, असा इशारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुखांनी दिला. २४ तासांपूर्वीच रशियाचे वरिष्ठ नेते दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी, रशिया बाल्टिक क्षेत्रात नवी अण्वस्त्रे तैनात करील, असे बजावले होते. त्यानंतर सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांनी रशियन अण्वस्त्रहल्ल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. बर्न्स यांनी यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन व अमेरिकी प्रशासन तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही वक्तव्य केले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह वरिष्ठ रशियन नेते तसेच अधिकार्‍यांनी सातत्याने आण्विक हल्ल्याबाबत इशारे दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर दोनदा अणुहल्ल्याचे संकेत दिले होते. पुतिन यांच्या या इशार्‍यांमुळे पाश्‍चिमात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण असून युक्रेननेही नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अणुहल्ल्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष‘युक्रेनमधील कारवाईत रशियाला काही धक्के बसले आहेत. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व इतर नेते हताश झाले आहेत. त्यामुळे रशियन नेतृत्त्व अण्वस्त्रांचा वापर करु शकते व ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही’, असा इशारा सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिला. रशियाने ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ अलर्टवर ठेवल्याने अमेरिका चिंतित असल्याचा दावाही त्यांनी केला. बायडेन प्रशासन तिसरे महायुद्ध व अणुहल्ला टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही बर्न्स म्हणाले.

दरम्यान, रशियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर नाटोने युरोपातील ‘न्यूक्लिअर प्लॅन्स’ची नव्याने आखणी सुरू केली आहे. याअंतर्गत नाटो सदस्य देशांकडे असलेल्या ‘एफ-३५’ या लढाऊ अमेरिकी विमानांवर अणुबॉम्ब तैनात करण्यात येणार आहेत. सध्या युरोपातील नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड यासारख्या देशांकडे ‘एफ-३५’ आहेत व जर्मनीनेही ‘एफ-३५’ घेण्याची घोषणा केली आहे. युरोपात सध्या पाच देशांमधील तळांवर अमेरिकी अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. त्यात जर्मनीसह बेल्जियम, इटली, नेदरलॅण्डस् व तुर्कीचा समावेश आहे.

leave a reply