‘आयएनएस वागशीर’चे पुढील आठवड्यात जलावतरण

मुंबई – प्रोजेक्ट-७५ अंतर्गत मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये उभारणी करण्यात आलेल्या ‘आयएनएस वागशीर’ या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडीचे पुढील आठवड्यात २० एप्रिलला जलावतरण होणार आहे. तर पुढील वर्षी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती अधिकार्‍याने दिली आहे. ‘प्रोजेक्ट-७५’अंतर्गत माझगांव डॉकमध्ये उभारण्यात येणार्‍या पाणबुड्यांपैकी ही शेवटची व सहावी पाणबुडी आहे. याआधी चार पाणबुड्या या नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत, तर पाचव्या पाणबुडीचे जलावतरण फेब्रुवारी महिन्यात झाले होते व या पाणबुडीच्या सध्या सागरी चाचण्या सुरू आहेत.

‘आयएनएस वागशीर’भारताने १९९९च्या कारगील युद्धानंतर नौदलाला अधिक बळकट करण्यासाठी प्रोजेक्ट-७५ हा प्रकल्प हाती घेतला होता. पुढील ३० वर्षांत नौदलासाठी पाणबुड्यांच्या ताफ्याची खरेदी व देशातच त्याच्या उभारणीची योजना होती. एकूण २४ पाणबुड्या उभारण्याच्या या योजनेत नंतर थोडे बदल करण्यात आले. परदेशी कंपनीकडून तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाअंतर्गत भारतातच हा प्रकल्प उभारण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमधून फ्रान्स स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडीची निवड करण्यात आली. फ्रेंच नेव्हल डिफेन्स ऍण्ड एनर्जी कंपनीच्या (डीसीएनएस) आराखड्यावर आधारलेल्या सहा पाणबुड्यांची माझगांव डॉकमध्ये उभारणी करण्याचा निर्णय झाला होता. यातील पहिल्या पाणबुडीची मागणी २००५ साली नोेंदविण्यात आली. मात्र या पाणबुडीची उभारणी होऊन त्याचे जलावतरण होईपर्यंत २०१५ साल उजाडले. आयएनएस कलावरी ही भारतात प्रोजेक्ट-७५ अंतर्गत निर्मित स्कॉर्पिन श्रेणीतील पहिली पाणबुडी होती. २०१७ साली आयएनएस कलावरी नौदलात दाखल झाली.

मात्र त्यानंतर या कार्यक्रमाला अधिक वेग देण्यात आला. गेल्या चार वर्षात स्कॉर्पिन श्रेणीतील आणखी तीन पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात आल्या असून पाचव्या पाणबुडीची सागरी चाचणी सुरू आहे. आयएनएस कलावरी, आयएनएस खांदेरी, आयएनएस करंज आणि आयएनएस वेला या चार पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. तर आयएनएस वागिरच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. आता ‘आयएनएस वागशीर’चे जलावतरण होत आहे. २०२३ च्या मध्यापर्यंत ही पाणबुडी आपल्या सागरी चाचण्या पूर्ण करून नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या माझगांव डॉकमध्ये आणखी सहा पाणुबड्यांचा प्रकल्प सुरू आहे. तसेच प्रोजेक्ट-१५ अंतर्गत ब्रॅव्हो विनाशिका आणि प्रोजेक्ट-१७ अंतर्गत अल्फा स्टेल्थ युद्धनौका तयार केल्या जात आहे. येथे तयार होत असलेल्या विनाशिका व स्टेल्थ युद्धनौकांपैकी प्रत्येकी एक विनाशिका व युद्धनौकेचे जलावतरण लवकरच होणार आहे, असे माझगांव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निवृत्त व्हाईस ऍडमिरल नारायण प्रसाद यांनी म्हटले आहे.

leave a reply