अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे इंडो-पॅसिफिकमध्ये युक्रेनसारखी शोकांतिका घडेल

- चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची नवी धमकी

बीजिंग – ‘अमेरिकेचे इंडो-पॅसिफिक धोरण या क्षेत्रात तणाव वाढवून संघर्षाला चिथावणी देत आहे. अमेरिकेची शीतयुद्धकालिन मानसिकता इंडो-पॅिसिफिक क्षेत्रात युक्रेनसारखी शोकांतिका घडवू शकते’, असा इशारा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी दिला. त्याचबरोबर व्हिएतनामने अमेरिकेच्या सापळ्यात अडकू नये, असे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. अमेरिकेच्या चिथावणीमुळे नाटोत सहभागी होण्याची तयारी करणार्‍या युक्रेनला रशियाने धडा शिकवला, तशीच गत अमेरिकेवर विसंबून चीनच्या विरोधात जाणार्‍या देशांची होईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री धमकावत आहेत.

युक्रेनसारखी शोकांतिकाचीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई आणि व्हिएतनामचे परराष्ट्रमंत्री बुई थान्ह सोन यांच्यात गुरुवारी फोनवरुन चर्चा पार पडली. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यावर चर्चा झाली. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीका केली. यासाठी परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा दाखला दिला.

‘आपल्या क्षेत्रात शांती आणि स्थैर्य कायम राखणे किती महत्त्वाचे आणि आवश्यक असते, हे युक्रेनच्या युद्धाने आशियाई देशांना दाखवून दिले आहे. गट बनवून संघर्ष केला तर अंतहिन धोका वाढतो, हे देखील युक्रेन युद्धातून शिकायला मिळते’, असा इशारा परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी दिला. इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची अमेरिकेची धोरणे आणि त्याला या क्षेत्रातील देशांकडून मिळणारे सहाय्य असियान सदस्य देशांच्या सुरक्षेला आव्हान देणारे ठरेल, असे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

युक्रेनसारखी शोकांतिकाचीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी थेट उल्लेख केला नसला तरी अमेरिका आणि तैवानमध्ये वाढत असलेल्या लष्करी सहकार्यावर निशाणा साधल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरवित आहे. तसेच अमेरिकेचे लोकप्रतिनिधी व अधिकारी तैवानला भेटी देत आहेत. यामुळे चीनची बेचैनी वाढली असून रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याप्रमाणे चीन देखील तैवानवर हल्ला चढविल, असे इशारे प्रसिद्ध झाले होते.

सुरुवातीला तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असल्याचे सांगून चीनने याची तुलना युक्रेनशी करण्याचे टाळले होते. पण गेल्या काही दिवसांपासून चीनच्या लष्करी हालचाली आणि तैवानच्या हवाईहद्दीतील चीनच्या लढाऊ विमानांची घुसखोरी वाढली आहे. शुक्रवारी चीनच्या लष्कराने तैवानजवळच्या भागात विशेष युद्धसराव आयोजित केला होता. यामध्ये चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या विनाशिका तसेच बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने सहभागी झाली होती. ईस्ट चायना सीपासून ते तैवानच्या क्षेत्रापर्यंत हा सराव सुरू होता.

चीनच्या या लष्करी हालचाली चिंताजनक असून युक्रेनप्रमाणे चीन तैवानवर हल्ला चढविल, असे इशारे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत. व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेतून चीनचे परराष्ट्रमंत्री तसा इशारा देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply